मुक्काम ठाेकलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाराची अखेर झाली नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:34+5:302021-04-18T04:36:34+5:30
उन्हाळी धान खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या कोरेगाव येथील केंद्रावर १६ एप्रिलपासून सातबाराची ऑनलाइन नाेंदणी करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. ...

मुक्काम ठाेकलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाराची अखेर झाली नाेंदणी
उन्हाळी धान खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या कोरेगाव येथील केंद्रावर १६ एप्रिलपासून सातबाराची ऑनलाइन नाेंदणी करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. त्यामुळे परिसरातील चोप, बोळधा, विसोरा आदी गावातील शेतकऱ्यांनी १५ एप्रिल राेजी रात्रीपासूनच नंबर लावण्यासाठी खरेदी केंद्रावर मुक्कामी होते. परंतु १६ला शेतकऱ्यांच्या सातबाराची ऑनलाइन नाेंदणी हाेणार नसल्याचे शेतकऱ्यांना सकाळी ९ वाजता कळले. त्यामुळे बोळधा येथील शेतकरी होमराज गायकवाड यांनी दूरध्वनीद्वारे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांना कळविले. तेव्हा सुरेंद्रसिह चंदेल यांनी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांना शेतकऱ्यांची अडचण सांगितली. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी व जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तसेच सुरेंद्रसिंह चंदेल यांनी फेडरेशनचे व्यवस्थापक तलमले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व ताबडतोब ऑनलाइन प्रक्रिया सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. तेव्हा सातबाराची ऑनलाइन नाेंदणी सुरू करण्यात आली. दरम्यान, देसाईगंजचे ठाणेदार जयस्वाल बाेळधाकडे जात असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसले. शेतकऱ्यांनी त्यांनाही आपली अडचण सांगितली. त्यांनीसुद्धा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर काही वेळातच फेडरेशनचे काही कर्मचारी कोरेगावला पोहाेचले व ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, माजी तालुकाप्रमुख नंदू चावला, होमराज गायकवाड, हेमराज गायकवाड, दिनेश कुरझेकर, अरुण राजगिरे, पुष्पराज गायकवाड, चित्तरंजन नाकाडे, तानाजी बुद्धे, पालकदास ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.
बाॅक्स
मका खरेदी केंद्र केव्हा सुरू हाेणार?
गडचिराेली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. सध्या मका काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यात आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मका खरेदी केंद्र सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे. धानाचे पीक निघण्यापूर्वीच उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे मार्केटिंग फेडरेशनने जाहीर केले आहे. परंतु मका काढणीला सुरुवात हाेऊनही अद्यापही मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत काहीच प्रक्रिया दिसून येत नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.