घारगावच्या सरपंचाचा झाला आदर्श विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:03+5:302021-04-22T04:38:03+5:30
भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे ...

घारगावच्या सरपंचाचा झाला आदर्श विवाह
भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे शासनाने लावलेल्या अटीमुळे अनेकांनी विवाह समोर ढकलल्याचे दिसून येते. लग्न सोहळा म्हटलं की, नुसती पैशांची उधळण. आतापर्यंत अनेक लोकांनी आपआपल्या पाल्याच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत घारगाव येथील सरपंच विवेक शेषराव भगत यांनी या सर्व गोष्टींना बगल देऊन वर-वधू आणि माता-पिता वगळता केवळ पाच लोकांच्या समक्ष लग्न करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यासंदर्भात शासनाने नवीन नियमावली बनवली आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात निर्बंध आलेले आहेत. घारगावचे सरपंच विवेक शेषराव भगत यांचा विवाह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कवठी येथील कोमल एकनाथ घोटेकर यांच्याशी २२ एप्रिल रोजी आयोजित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व शासनाच्या नियमांचे पालन करीत लग्न विवाहतिथी टाळत, २० एप्रिल रोजी वधूपक्षाच्या घरी जाऊन विवाह लावला.
आपण सरपंच आहोत, असं न मिरवता, कोणताही मोठा गाजावाजा व कोणतीही गर्दी न करता अगदी साध्या पध्दतीने तसेच शासनाने लावलेले सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला.
(बॉक्स)
इतर गावकरीही कित्ता गिरवणार
या गावांत समोर आणखी १४ लग्न असल्याने या नवतरुण सरपंचाने लग्न असलेल्या घरी जाऊन त्यांना सध्या सुरू असलेल्या महामारीबद्दल व शासनाच्या नियमांबद्दल विस्तृत माहिती दिली व मोजक्याच लोकांमध्ये लग्नकार्य आटोपण्याबाबत समज दिली. त्याबद्दलची नोटीसही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दिली. त्यामुळे गावातील प्रथम व्यक्ती अगदी साध्या पध्दतीने विवाह करू शकते, तर आपणही आपल्या पाल्याचे लग्न साध्या पध्दतीनेच करणार, असा निर्धार लग्न जुळलेल्या कुटुंबांतील व्यक्तीनी केला आहे.