चामाेर्शी तालुका गडचिराेली जिल्ह्यात सर्वात माेठा तालुका आहे. चामाेर्शी शहराची लाेकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच येथील रहदारी ही वाढली आहे. वर्षभरापासून कायम असलेल्या काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तालुका प्रशासनासह नगरपंचायत प्रशासन विविध उपाययाेजना करीत आहे. परंतु काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत घातक ठरत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार शहरात सॅनिटायझर फवारणीचे काम सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या निर्देशानुसार शनिवार व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद असतात. त्यामुळे फवारणी करणे सोयीचे होते. शहरातील मुख्य मार्गालगत दुकान भागाची तसेच रस्त्याच्या बाजूने ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्याचे काम केले जात आहे तर ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले अशा भागात पंपाद्वारे फवारणीचे काम नगरपंचायत मधील सफाई कामगार करीत आहेत. ज्या भागात ट्रॅक्टर जाते, त्या भागात ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी फवारणीचे ट्रॅक्टर जात नाही अशा प्रभागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्याचे, निर्जंतुकीकरण हातपंपांद्वारे केले जात आहे. संपूर्ण वाॅर्डात ही माेहीम सुरू आहे. फवारणीच्या कामावर नगरपंचायतचे अभियंता निखिल करेकर हे देखरेख ठेवत असून हाफिज सय्यद यांच्यासह नगरपंचायत सफाई कर्मचारी काम करीत आहेत.
बाॅक्स
तालुक्यात ३५ रुग्णांचा मृत्यू
चामाेर्शी तालुक्यात आतापर्यंत १ हजार ८५२ काेराेना बाधित आढळून आले आहेत. यापैकी १ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू काेराेनाने झाला आहे. सध्या ३७५ रुग्ण उपचार घेत आहेत. चामाेर्शी शहरातही अनेक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखता यावा यासाठी आराेग्य विभाग व स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.