गोदावरीच्या पात्रात रात्रीही चालते रेती तस्करी
By Admin | Updated: December 11, 2015 01:58 IST2015-12-11T01:58:33+5:302015-12-11T01:58:33+5:30
नागपूर उच्च न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत गौण खनिजाच्या उत्खनन प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली नाही.

गोदावरीच्या पात्रात रात्रीही चालते रेती तस्करी
पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा संशय : मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर
आनंद मांडवे सिरोंचा
नागपूर उच्च न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत गौण खनिजाच्या उत्खनन प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली नाही. तरीही गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या सुमारास ७ ते ८ ट्रॅक्टरने दर दिवशी शेकडो ब्रॉस रेतीची तस्करी केली जात आहे. या तस्करीला महसूल विभाग, पोलीस विभाग व वन विभागाचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकमत प्रतिनिधीने २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात रेती तस्करी होत असल्याचा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही. यावरून या तस्करीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा हातभार असल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर अखेर अधिकृत उत्खननाची मुदत संपूनही गोदावरी नदी पात्रातील निर्माणाधिन आंतरराज्यीय पुलालगत रेतीची तस्करी करण्यात येत आहे. सदर गैर प्रकार २२ नोव्हेंबरच्या रात्री उघडकीस आला. वन विभागाचे पथक गस्त घालत असताना एक रेती भरलेला ट्रॅक्टर सिरोंचा शहराकडे जात असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता, ट्रॅक्टर मालकाने सदर रेती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार मी सिरोंचा पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अर्ध्या तासापूर्वी एक ट्रॅक्टर रेतीची वाहतूक पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची कबुली दिली. सदर कंत्राटदाराचे नाव व्यंकटेश पुजारी असे आहे. या घटनेच्या वेळी गस्ती प्रमुख संजय खडतर यांच्यासह प्रस्तूत प्रतिनिधी व अन्य एक सहकारी उपस्थित होता. व्यंकटेशच्या विधानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पथकाने विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह पोलीस ठाणे गाठले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तैनात सेंट्रीने आत जाण्यास मज्जाव केला. घडलेला प्रकार व व्यंकटेशचे वक्तव्य याबाबत सांगितल्यावर वरिष्ठांना सूचना देण्यासाठी तो आत गेला. काही वेळाने परत आला. त्याच्यासोबत दुसरा अधिकारी होता. पण तो काहीच बोलला नाही. कंत्राटदार व्यंकटेशने केलेल्या वक्तव्याचे खंडण करण्यास कोणताच जबाबदार अधिकारी प्रवेशद्वाराजवळ फिरकला नाही. मात्र यापूर्वी ट्रॅक्टरने पोलीस ठाण्यात रेती वाहतूक झाल्याचे सेंट्रीने सांगितले. गस्ती पथकाने पकडलेला ट्रॅक्टर हात घेण्यास त्यांनी नकार दिला व ट्रॅक्टर तेथून हटविण्यास सांगितले. या संधीचा फायदा घेऊन व्यंकटेश ट्रॅक्टरसह रात्री १२.५६ वाजता पळून गेला. गस्ती पथकाच्या संजय खरतडनेही वाहन जप्त केले नाही. या सर्व घटनाक्रमामुळे पोलीस, वन विभाग व महसूल विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.