संभू नरका जागरण पंडूम साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:00 IST2017-03-02T02:00:56+5:302017-03-02T02:00:56+5:30
संभू गौराल गोटूल मांदी शाखा मुडेवाही, रेगुलवाही, बेज्जूरपल्ली, मोतुकपल्लीच्या सामूहिक सहकार्याने

संभू नरका जागरण पंडूम साजरा
शेकडो आदिवासी बांधवांची उपस्थिती
सिरोंचा : संभू गौराल गोटूल मांदी शाखा मुडेवाही, रेगुलवाही, बेज्जूरपल्ली, मोतुकपल्लीच्या सामूहिक सहकार्याने द्विदिवसीय संभू नरका जागरण पंडूम साजरा झाला. सदर सोहळ्याचे आयोजन जागतिक गोंड सगा मांदी जिल्हा शाखा, गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली मार्गदर्शक विश्वनाथ कोकोडे होते. उद्घाटन चांदागड मुर्शेनाल आनंद मडावी (गोंदिया) यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नारायण तलांडे, तोर मुर्शेनाल भगवान मडावी होते. रेगुलवाहीचे सरपंच लिंगा वेलादी, उपसरपंच गणपत नैताम, बेजुरपल्लीच्या सरपंच इप्पो मडावी, रेगुलवाहीच्या गणमान्य रामबाई गावडे आदींच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुधाकर नैताम, सुरेश कुळमेथे, सिद्धू कुळमेथे, रंगा मडावी, बापू कुलसंगे, बापू तलांडी, फुसुकपल्लीचे बापू पोरतेट यांच्यासह परसेवाडा परिसरातील शेकडो आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.
सोहळ्याच्या पहिल्या सत्रात संभू गवरा पेन ठाण्यापासून पेरसापेन झेंड्यापर्यंत ढोल, ताशा हाकुमीच्या आदिवासी तालासुरात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पूजा पठाननंतर परसेवाडा पहाडीच्या निसर्गरम्य परिसरातील लिंगो-जंगो, संभू-गौरा पेन ठाण्याजवळ पुन्हा धार्मिक विधी पार पडले. युवक व तरूणांच्या रेला नृत्याने सादरीकरण करून पूर्ण रात्र जागरण झाले. दरम्यान मध्यांतरात ‘कोया पुनेम’ या विषयावर मुर्शेनाल आनंद मडावी यांनी पौराणिक व ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ देऊन गोंडी धर्माचे श्रेष्ठत्व पटविले. या चर्चासत्राचे संचालन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर मडावी यांनी केले. यावेळी गोंडी भजनाचा कार्यक्रमही पार पडला. आनंद मडावी यांच्या हस्ते गोंडी धर्मिय सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी पेरसा पेन सेवा सेवा, पहांदी पारी कुपार लिंगोना सेवा सेवा, संभू गौराना सेवा सेवा, जय सेवा जय गोंडवानाचा सामूहिक जयघोष करण्यात आला. पंडूमच्या दुसऱ्या सत्रात बेजुरपल्ली येथे सुद्धा विविध धार्मिक विधीनुसार ध्वजारोहण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)