लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी ४९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नाेंद करण्यात आली तर १५ काेराेनाबाधितांनी जीव गमावला. उपचार घेणाऱ्या २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ हजार ८२ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९५ लाेकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी काेराेनाबाधित १५ लाेकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६७ वर्षीय महिला ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ६७ वर्षीय पुरुष जि. चंद्रपूर, ५४ वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, ६५ वर्षीय महिला आरमोरी, ३४ वर्षीय पुरुष पोलीस कॉलनी, गडचिरोली, ५९ वर्षीय पुरुष विवेकांनदनगर, गडचिरोली, ४० वर्षीय पुरुष वडसा, ५४ वर्षीय पुरुष कुरखेडा, ६५ वर्षीय महिला वडसा, ७२ वर्षीय पुरुष विसाेरा, ता. वडसा, ६९ वर्षीय पुरुष आरमोरी, ५२ वर्षीय पुरुष अहेरी, ४४ वर्षीय पुरुष आमगाव, ता. वडसा, ३३ वर्षीय महिला चंद्रपूर, ४० वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८९ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २२.४२ टक्के तर मृत्युदर १.६९ टक्के आहे. दरराेज १२ पेक्षा अधिक रूग्ण मृत्यूमुखी पडत आहेत.
परिचर्या महाविद्यालयातही काेराेनाचा शिरकाव गडचिराेली : काॅम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भागातील शासकीय परिचर्या महाविद्यालयातील पाच प्रशिक्षणार्थी परिचारिकांना काेराेनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. या पाच प्रशिक्षणार्थींमध्ये एएनएमच्या तीन व जीएनएमच्या दाेन विद्यार्थिनींचा समावेश आहे. शासकीय परिचर्या महाविद्यालयात ६५ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी आहेत. जिल्हा रुग्णालयासह काेविड रुग्णालयातही या प्रशिक्षणार्थींची ड्यूटी लावली जाते. दरम्यान, सेवा देतानाच पाच प्रशिक्षणार्थींचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी बाधित प्रशिक्षणार्थींना वेगळे ठेवून औषधाेपचार करावा आणि उर्वरित प्रशिक्षणार्थींना काेराेनाची लागण हाेऊ नये, यासाठी उपाययाेजना करावी, अशी मागणी हाेत आहे.
चाैकात फिरणाऱ्यांची संख्या राेडावलीकाेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाेलीस विभागाने इंदिरा गांधी चाैकात तंबू उभारला आहे. या तंबूत अनेक पाेलीस तैनात राहत आहेत. शिवाय आरमाेरी मार्गावर व चाैकात वाहतूक पाेलिसांनी कारवाईची माेहीम सुरू केली आहे. त्यामुळे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
असे आहेत तालुकानिहाय बाधित रूग्णनवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५७, अहेरी तालुक्यातील २६, आरमोरी ५५, चामोर्शी तालुक्यातील ५७, धानोरा तालुक्यातील ३५, एटापल्ली तालुक्यातील २३, कोरची तालुक्यातील २९, कुरखेडा तालुक्यातील ३९, मुलचेरा तालुक्यातील २५, सिरोंचा तालुक्यातील ९ तर वडसा तालुक्यातील ४२ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १३८, अहेरी ६, आरमोरी २५, भामरागड ५, चामोर्शी ११, धानोरा ८, एटापल्ली १०, मुलचेरा २, सिरोंचा ३, कोरची १२, कुरखेडा १९, तसेच देसाईगंज येथील ४४ जणांचा समावेश आहे.