शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार
By Admin | Updated: July 28, 2016 01:58 IST2016-07-28T01:58:00+5:302016-07-28T01:58:00+5:30
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात बिगर राजकीय चळवळ म्हणून सामाजिक काम करीत आहे.

शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार
गडचिरोलीत संघटन वाढविणार : मनोज आखरे, सौरभ खेडेकर यांची माहिती
गडचिरोली : मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात बिगर राजकीय चळवळ म्हणून सामाजिक काम करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व ओबीसी शिष्यवृत्ती प्रश्नावर संभाजी ब्रिगेड लवकरच सरकारच्या विरोधात लढा उभारणार, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडची संघटन बांधणी करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करून बैठका घेण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढविण्यासाठी गाव तिथे कार्यकर्ता हा उपक्रम राबविण्यात येणार असून शेतकरी, युवक, विद्यार्थी व महिला हे आमच्या संघटनेचे केंद्रबिंदू राहतील, असे त्यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक प्रश्नांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, पांडुरंग नागापुरे, अक्षय ठाकरे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे, चंद्रशेखर झाडे, पुरूषोत्तम झंजाळ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)