समता दिंडीने दुमदुमले गडचिरोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 02:05 IST2015-06-27T02:05:26+5:302015-06-27T02:05:26+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज

समता दिंडीने दुमदुमले गडचिरोली
गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीला सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे , नामदेवराव गडपल्लीवार, नानाजी वाढई व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये वसंत विद्यालय शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यानंतर सकाळी ११ वाजता कॉम्प्लेक्स परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते.
प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, प्रा. दिलीप चौधरी होते. मंचावर नामदेवराव गडपल्लीवार, दलितमित्र नानाजी वाढई, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, उपप्राचार्य सुरेश डोंगे, सोपान म्हशाखेत्री, जिल्हा नियोजन अधिकारी सुटे, जि.प.चे प्रभारी समाज कल्याण अधिकारी कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून देण्याचे तसेच दीनदुबळ्या गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले. समाजातील विषमता दूर करून समाज एकसंघ व्हावा, अशी छत्रपती शाहू महाराजाची भूमिका होती. याकरिता तळागाळातील लोकांना समान संधी दिली पाहिजे.
छत्रपती शाहू महाराजांची पे्ररणा समाजातील प्रत्येक घटकांनी आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. चौधरी यांनी केले. यावेळी जि.प. चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते यांनीही मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)