पारडी येथे युरिया खताची जादा भावाने विक्री
By Admin | Updated: August 20, 2016 01:30 IST2016-08-20T01:30:01+5:302016-08-20T01:30:01+5:30
तालुक्यातील पारडी येथील प्रीती कृषी केंद्रात युरिया, कृषीदेव, इफको या खतांची जादा दराने विक्री केली जात आहे.

पारडी येथे युरिया खताची जादा भावाने विक्री
कृषी विभागाचे दुर्लक्ष : युरियासाठी घेतले जात आहे ३४० रूपये
गडचिरोली : तालुक्यातील पारडी येथील प्रीती कृषी केंद्रात युरिया, कृषीदेव, इफको या खतांची जादा दराने विक्री केली जात आहे. सदर कृषी केंद्र चालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खत विक्रेत्याने शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्येच खतांची विक्री करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खताच्या किंमतीविषयीची माहिती व्हावी, यासाठी दुकानाच्या बाहेर खतांच्या किंमतीचे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक शासकीय दरापेक्षा जादा दराने खताची विक्री करीत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला बिल देणे गरजेचे असल्याने बिल देतेवेळी मात्र शासकीय नियमानुसार युरियाचे २९८ रूपयांचे व इफकोचे ९०० रूपयांचे बिल देतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून ३४० ते ४०० रूपये घेतले जात आहेत. नाईलाजास्तव पारडी परिसरातील शेतकऱ्यांना आगाऊची किंमत देऊन खत खरेदी करावे लागत आहे. कृषी केंद्र चालकाकडून लूट केली जात असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र संबंधित कृषी केंद्र चालकावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत. गावातील काही नागरिकांनी कृषी केंद्र चालकाची कृषी विभागाकडे तक्रारही दाखल केली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेच्या दुप्पट किंमतीने खताची विक्री केली जात आहे. मागील वर्षीच्या खताची यावर्षी विक्री केली जात आहे. सदर खताचा खडकाप्रमाणे गोळा तयार झाला आहे. त्यामुळे त्याची क्षमतासुद्धा कमी झाल्याची शक्यता आहे. युरिया खताच्या बिलापेक्षा ४२ रूपये अधिकचे घेतले जात आहे. ही शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती केदारनाथ कुंभारे यांनी केली आहे. याबाबत प्रीती कृषी केंद्राचे संचालक ईश्वर मुळे यांना विचारणा केली असता, आपल्याला परवडत नसल्याने अधिकची किंमत घेतली जात आहे. याबाबत आपल्याला काहीच बोलावयाचे नाही, असे त्यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.