जिल्ह्यातील ११२ तेंदू युनिटची विक्री

By Admin | Updated: April 11, 2015 01:34 IST2015-04-11T01:34:51+5:302015-04-11T01:34:51+5:30

जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारा तेंदू संकलन व्यवसायाची तयारी वन विभागाने जोमात सुरू केली आहे.

Sales of 112 tendu units in the district | जिल्ह्यातील ११२ तेंदू युनिटची विक्री

जिल्ह्यातील ११२ तेंदू युनिटची विक्री

३५ युनिट शिल्लक : पेसा क्षेत्रातील पहिल्या फेरीत ४६ तर दुसऱ्या फेरीत ५७ युनिटचा लिलाव
गडचिरोली :
जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारा तेंदू संकलन व्यवसायाची तयारी वन विभागाने जोमात सुरू केली आहे. पेसा क्षेत्राबाहेरील नऊ व पेसा क्षेत्राच्या हद्दीतील १०३ अशा एकूण ११२ तेंदू युनिटची विक्री ई-निविदा प्रक्रियेच्या लिलावातून झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी पाच वन विभागांतर्गत मोठे जंगल क्षेत्र आहे. या जंगलात तेंदूपत्ता झाडांची संख्या प्रचंड आहे. दोन वर्षांपूर्वी वन विभाग ई-निविदा लिलाव प्रक्रिया राबवून थेट कंत्राटदारांना तेंदू संकलन विक्री करण्याचे काम सोपवीत होते. मात्र वनाधिकार व राज्यपालांच्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांचा तेथील वनोपजाच्या संकलन व विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे वन विभागाने यंदा पेसा हद्दीतील पहिल्या टप्प्यात ४६ तेंदू युनिट तर दुसऱ्या टप्प्यात ५७ तेंदू युनिट ग्रामसभांना विकले आहेत. पेसा बाहेरील क्षेत्रातील नऊ तेंदू युनिटची विक्री झाली आहे. यामध्ये आलापल्लीत वन विभागातील मट्टेगुडा, कोपरअली, मुलचेरा, गडचिरोली वन विभागातील सावेला, नवेगाव, मुरूमुरी आदी युनिटचा समावेश आहे. पेसा क्षेत्रातील गडचिरोली वन विभागातील १४, वडसा वन विभागातील १४, आलापल्ली वन विभागातील पाच, भामरागड वन विभागातील १०, सिरोंचा वन विभागातील तीन तेंदू युनिटचे लिलावाच्या माध्यमातून विक्री झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात पेसा क्षेत्रातील ५७ तेंदू युनिटची विक्री झाली. यामध्ये गडचिरोली वन विभागातील १४, वडसा वन विभागातील सहा तेंदू युनिटचा समावेश आहे.

बोनसवर प्रश्नचिन्ह
खासगी कंत्राटदारांना तेंदू युनिटची विक्री केल्यानंतर वन विभागमार्फत तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरूपात मजुरीची रक्कम दिल्या जात होती. मात्र यंदा पेसा क्षेत्रातील तेंदू युनिटची विक्री ग्रामसभांना करण्यात आली आहे. यामुळे वन विभागाला महसूल मिळत नसल्याने मजुरांच्या बोनसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मे महिन्यात तेंदू हंगाम सुरू होणार
जिल्ह्यातील पाच वन विभागातील ३५ तेंदू युनिटची विक्री होणे शिल्लक आहे. वन विभागाच्या वतीने सदर तेंदू युनिटचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेसाठी हालचाली तीव्र झाले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसपर्यंत उर्वरित ३५ तेंदू युनिटची विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर मे महिन्यापासून जिल्ह्यात तेंदू संकलनाच्या हंगामाला सुरूवात होणार आहे. या तेंदू संकलन व्यवसायातून जिल्ह्यातील हजारो आदिवासी व बिगर आदिवासी नागरिकांना रोजगार मिळणार आहे. यावर कुटुंबांचा आर्थिक बजेट राहणार आहे.

Web Title: Sales of 112 tendu units in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.