कृषी केंद्राकडून बोगस बियाण्यांची विक्री
By Admin | Updated: June 29, 2015 01:56 IST2015-06-29T01:56:28+5:302015-06-29T01:56:28+5:30
जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करतात.

कृषी केंद्राकडून बोगस बियाण्यांची विक्री
कारवाई करा : पोलीस ठाण्यात तक्रार
देसाईगंज : जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करतात. असाच काहीसा प्रकार देसाईगंज शहरात उजेडात आला आहे. या संदर्भात विर्शी वार्डातील शेतकरी कमलाकर रामकृष्ण राऊत यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात कमलाकर राऊत यांनी रविवारी देसाईगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
कमलाकर राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मोनिका चंद्रशेखर वाघमारे यांच्या परवानाप्राप्त देसाईगंज शहरातील पारस कृषी केंद्रातून उन्हाळी धान पिकासाठी ४ हजार ८० रूपये किमतीचे ओम श्रीराम जातीचे सहा बॅग बियाणे खरेदी केले. या बियाण्यांची धान पेरणी झाल्यापासून १२५ दिवसांच्या आत उत्पन्न निघण्याची हमी संबंधित कृषी केंद्र संचालकाने दिली होती. मात्र १२५ दिवसांचा कालावधी उलटूनही धानाचे उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे १.४६ हेक्टर आर शेत जमिनीतील धान पिकाचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. संबंधित कृषी केंद्र संचालकाने आपली फसवणू केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कमलाकर राऊत याने पोलीस तक्रारीतून केली आहे. (वार्ताहर)
कृषी केंद्र संचालकाने बियाणे विक्रीच्या वेळी धान पिकाच्या उत्पादनाच्या कालावधीची हमी दिली होती. मात्र विहित कालावधीत उत्पादन हाती न आल्याने आपण कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या धान पिकाच्या शेतीचा पंचनामाही केला. मात्र संबंधित कृषी केंद्र संचालकावर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही शेतकरी कमलाकर राऊत यांनी म्हटले आहे.