पगारदार कर्मचाऱ्यांना आता दुप्पट विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST2020-11-28T05:00:00+5:302020-11-28T05:00:20+5:30
जिल्हा परिषदेचे सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये कार्यरत कर्मचारी, खासगी अनुदानीत आश्रमशाळांचे शिक्षक व कर्मचारी अशा एकूण जवळपास १२ हजार ६०० कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार बँकेने ऑगस्ट २०१९ पासून अपघात विमा याेजना सुरू केली. या याेजनेअंतर्गत खातेदार कर्मचाऱ्याचा सुमारे १७ लाख रुपयांचा अपघात विमा बँकेमार्फत काढला जात हाेता.

पगारदार कर्मचाऱ्यांना आता दुप्पट विमा कवच
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खात्यामार्फत वेतन हाेते, अशा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी बँकेने ऑगस्ट २०१९ पासून अपघात विमा याेजना सुरू केली आहे. पूर्वी १७ लाख रुपयांचा अपघात विमा काढला जात हाेता. आता त्यात दुपटीने वाढ करून ताे ३० लाख रुपये केला आहे.
जिल्हा परिषदेचे सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये कार्यरत कर्मचारी, खासगी अनुदानीत आश्रमशाळांचे शिक्षक व कर्मचारी अशा एकूण जवळपास १२ हजार ६०० कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार बँकेने ऑगस्ट २०१९ पासून अपघात विमा याेजना सुरू केली. या याेजनेअंतर्गत खातेदार कर्मचाऱ्याचा सुमारे १७ लाख रुपयांचा अपघात विमा बँकेमार्फत काढला जात हाेता. विम्याच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी शिक्षक व इतर पगारदार कर्मचाऱ्यांमार्फत बँकेकडे केली जात हाेती.
अनेक शिक्षक संघटनांनी जिल्हा बँकेेच्या व्यवस्थापनाकडे निवेदन सादर केले हाेते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार व बँक व्यवस्थापनाने विम्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुमारे ३० लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे, पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा याेजना सुरू करणारी गडचिराेली जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या बँकेचे अनुकरण करीत राज्यातील इतरही सहकारी बँकांनी अपघात विमा याेजना सुरू केली आहे.
पगारदार कर्मचाऱ्यांना चांगल्या साेयीसुविधा पुरविण्याचा बँकेनेे आजपर्यंत नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी बँकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अपघात विम्यात वाढ करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात हाेती. या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेत बँक व्यवस्थापनाने अपघात विम्याच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सतीश आयलवार, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिराेली
एकाला लाभ, चार प्रक्रियेत
जिल्हा बँकेने अपघात विमा याेजना सुरू करण्यास आता जवळपास सव्वा वर्ष पूर्ण हाेत आहे. या कालावधीत अपघातात मृत्यू झालेल्या एका शिक्षकाच्या कुटुंबाला अपघात विम्याचा लाभ देण्यात आला आहे तर चार प्रकरणे प्रक्रियेत असल्याचे सीईओ सतीश आयलवार यांनी सांगितले.