घारगावात साकारतेय संत गजानन महाराज मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:51+5:302021-04-20T04:37:51+5:30
तालुक्यातील घारगावजवळ मूल-हरणघाट-चामाेर्शी मार्गावरून २ किमी अंतरावर असलेल्या प्रमाेद गाेविंदा भगत यांच्या शेतात एक एकर जागेत संत गजानन महाराज ...

घारगावात साकारतेय संत गजानन महाराज मंदिर
तालुक्यातील घारगावजवळ मूल-हरणघाट-चामाेर्शी मार्गावरून २ किमी अंतरावर असलेल्या प्रमाेद गाेविंदा भगत यांच्या शेतात एक एकर जागेत संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या मंदिरामुळे परिसरातील भाविकांना साेयीचे हाेणार आहे. तसेच हे मंदिर सामाजिक कार्यासाठीसुद्धा उपयाेगी ठरणार आहे.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद उरी बाळगून प्रमोद भगत यांनी शेतात गजानन महाराजांचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले. सध्या हे बांधकाम प्रगतिपथावर आहे. भगत यांनी गजानन महाराज सेवा संस्थान घारगाव ही संस्था स्थापन केली आहे. रस्त्यालगत असलेल्या स्वमालकीच्या एकरभर जागेत ४० बाय ५५ फूट आकारात मंदिर बांधकाम सुरू आहे. गरीब जनतेची सेवा व त्यांना वेळाेवेळी सहकार्य करण्याची भावना ठेवून माजी पं. स. सदस्य प्रमाेद भगत व जि. प. सदस्य कविता भगत यांनी वेळाेवेळी विविध उपक्रम राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून गजानन महाराज मंदिर बांधकामाची संकल्पना त्यांना सुचली. त्यानुसार आता त्याला हळूहळू आकार मिळत आहे. पुढील प्रगटदिनी हे मंदिर लोकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. गजानन महाराज मंदिर बांधकामामुळे घारगावच्या वैभवात भर पडणार असून तालुक्यातील भाविकांना दर्शनाची साेय हाेणार आहे.
बाॅक्स
वाचनालयासह क्रीडा साहित्य राहणार
गजानन मंदिरात विविध साेयीसुविधा राहणार आहेत. येथे ध्यान मंदिर, वाचक व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी शिवाजी महाराज कला क्रीडा व साहित्य केंद्र, यासोबतच मोकळ्या जागेत मुलांना खेळता यावे यासाठी क्रीडा साहित्य तसेच गोरगरीब जनतेला विवाह सोहळे सहजपणे करता यावीत यासाठी सभागृह एवढेच नव्हे तर निराधार नागरिकांसाठी निवासाची सोय व भोजनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे.