साई मंदिर सभागृहाला ठोकले ‘सील’
By Admin | Updated: March 11, 2015 00:04 IST2015-03-11T00:04:29+5:302015-03-11T00:04:29+5:30
येथील चामोर्शी मार्गावरील साई मंदिरातील सभागृहाचा गैरवापर होत असून सदर भाडेतत्वावर देऊन केवळ व्यावसायीकरण होत असल्याच्या कारणावरून....

साई मंदिर सभागृहाला ठोकले ‘सील’
गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील साई मंदिरातील सभागृहाचा गैरवापर होत असून सदर भाडेतत्वावर देऊन केवळ व्यावसायीकरण होत असल्याच्या कारणावरून नगर परिषद प्रशासनाने आज मंगळवारी मंदिराच्या सभागृहाला दुपारच्या सुमारास सील ठोकले.
सामाजिक कार्यकर्ते कैलाश शर्मा यांनी साई मंदिराच्या हॉलचा वापर आर्थिक मिळकतीसाठी करण्यात आला असून विशिष्ट लोकांसाठी त्याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याबाबतची तक्रार जिल्हा लोकशाही दिनात केली होती. याशिवाय येथील इंदिरा गांधी चौकात उपोषणही केले होते. लोकशाही दिनाच्या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासनाला दिले होते. या आधारे न.प. प्रशासनाकडून श्रीराम सेवा मंडळ गडचिरोलीला साई मंदिर व हॉल बांधकामाबाबत आवश्यक दस्तावेज सादर करण्याची नोटीस दोनदा बजाविण्यात आली. मात्र या संदर्भात मंडळाने कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न.प.कडे सादर केले नाही. त्यामुळे अखेर आज मंगळवारला न.प. प्रशासनाने साई मंदिराच्या हॉलला सील ठोकल्याची कारवाई केली. यावेळी न.प.चे कर्मचारी एस. ए. पुनवटकर, जी. टी. मैंद, एन. पी. कुकडे, ए. ए. आखाडे, प्रदीप मडावी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किरण मडावी, सत्यनारायण कलंत्री, कैलाश शर्मा आदी उपस्थित होते. श्रीराम सेवा मंडळाने मंदिर व हॉल बांधकामाबाबत संयुक्तीक कागदपत्रे सादर केल्यानंतर या प्रकरणी फेरविचार करणार असल्याची माहिती जी. टी. मैंद यांनी लोकमतला दिली. (स्थानिक प्रतिनिधी)