वीज मीटर एनओसीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:25 IST2018-02-12T23:24:50+5:302018-02-12T23:25:06+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारपासून जत्रा भरणार आहे. या जत्रेच्या अनुषंगाने प्रशासन व देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Running for power meter NOC | वीज मीटर एनओसीसाठी धावपळ

वीज मीटर एनओसीसाठी धावपळ

ठळक मुद्देस्थानिक स्तरावर व्यवस्था नाही : मार्र्कंडा यात्रेतील व्यावसायिकांची गडचिरोलीकडे वारी

आॅनलाईन लोकमत
मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारपासून जत्रा भरणार आहे. या जत्रेच्या अनुषंगाने प्रशासन व देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. येथे व्यवसाय करण्यासाठी अनेक व्यावसायिक दाखल झाले आहेत. मात्र यंदा तात्पूरत्या स्वरूपाचे वीज मीटर देण्याची कोणतीही व्यवस्था महावितरणच्या वतीने स्थानिक स्तरावर करण्यात आली नाही. त्यामुळे एनओसीसाठी व्यावसायिकांना गडचिरोली जिल्हा मुख्यालय गाठावे लागत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे मोठी यात्रा भरत असल्याने संपूर्ण विदर्भातून तसेच लगतच्या तेलंगणा राज्यातून येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या जत्रेत विविध प्रकारच्या वस्तूंचे दुकान थाटून व्यवसाय करणे अनेकांना सोयीचे ठरते. जत्रेच्या माध्यमातून अनेकांना रोजगारही मिळत असतो. मात्र बहुतांश दुकानांसाठी वीजेची गरज असते. त्यासाठी वीज मीटर मिळण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी व्यावसायिकांना मार्र्कंडादेव ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागत आहे. त्यानंतर चामोर्शी पंचायत समितीकडून एनओसी घेतल्यानंतर गडचिरोली येथील महावितरणच्या कार्यालयात पुन्हा नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. यापूर्वी महावितरणच्या वतीने येथील व्यावसायिकांना तात्पूरत्या स्वरूपाचे वीज मीटर देण्याबाबत एनओसीची संपूर्ण सुविधा मार्र्कंडादेव येथे करण्यात येत होती. मात्र यंदा महावितरणने अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था स्थानिक स्तरावर केली नाही. त्यामुळे यात्रेतील व्यावसायिकांची प्रचंड गैरसोय होत असून वीज मीटर एनओसीसाठी व्यावसायिक धावपळ करीत असल्याचे चित्र आहे.
व्यावसायिकांची तारांबळ
यात्रेतील दुकानांसाठी विद्युतीकरणाची आवश्यकता असल्याने वीज मीटर एनओसीकरिता व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे. यात्रेकरू दाखल होत असल्याने दुकान सजवावे की वीज मीटरच्या एनओसीसाठी चामोर्शी व गडचिरोलीच्या वाºया कराव्यात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे.

Web Title: Running for power meter NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.