रॉयच्या घरावर दुसऱ्या दिवशीही पडला हातोडा
By Admin | Updated: February 19, 2017 01:12 IST2017-02-19T01:12:48+5:302017-02-19T01:12:48+5:30
आष्टी रोडजवळील मोठ्या नहरला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४२/१ आराजीमधील ८.२८ हेक्टर पैकी १.६० हेक्टर आर

रॉयच्या घरावर दुसऱ्या दिवशीही पडला हातोडा
११ नागरिकांना बजावल्या नोटीस : १.६० हेक्टर आर जागेवर केले होते अतिक्रमण
गडचिरोली : आष्टी रोडजवळील मोठ्या नहरला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४२/१ आराजीमधील ८.२८ हेक्टर पैकी १.६० हेक्टर आर शासकीय जागेवर अनाधिकृत अतिक्रमण धर्मा निमाई रॉय यांनी केले होते. या जागेवरीलही अतिक्रमण काढण्याची कारवाई शनिवारी महसूल प्रशासनाने केली व येथे धर्मा रॉय यांचे वास्तव्य असलेल्या आलिशान मकानाला जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याच परिसरात असलेल्या अतिक्रमणीत धानाचे शेत, ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने सपाट करण्यात आले. याशिवाय त्याच परिसरातील शासकीय जागेवर अतिक्रमणधारक ११ नागरिकांना नोटीस बजावून २४ तासाच्या आत अतिक्रमण काढण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर हातोडा चालविल्याने उर्वरित चामोर्शी शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धर्मा रॉय यांचे अतिक्रमण पाडताना उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरिक्षक किरण अवचर, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एस. के. बावणे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, तलाठी डी. एस. शेडमाके यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
धर्मा रॉय व त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाचे भक्कम वलय लाभलेले होते. भारतीय जनता पक्षातील राजकीय स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत सदर कारवाई टाळली जात होती. मात्र महसूल प्रशासनाने शुक्रवारपासून या कारवाईला प्रारंभ केला व धर्मा रॉय याचे अतिक्रमण उदध््वस्त केले. दरम्यान धर्मा रॉय यांच्या आई चामोर्शी नगर पंचायतीच्या नगरसेवक मंजुषा निमाई रॉय यांनी न्यायालयाची स्थगिती असतानाही अतिक्रमण महसूल प्रशासनाने पाडले आहे. त्यामुळे आपले कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने आपल्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत शनिवारी केली. (शहर प्रतिनिधी)
घरातून हे सामान केले जप्त
धर्मा रॉय राहत असलेल्या घरावर बुलडोजर चालविण्यापूर्वी प्रशासनाने या घरातील फ्रिज, एलपीजी, एलईडी, एसी, वॉटर प्युरीफायर, ज्युसर, तीन पलंग, लोखंडी गेट, ३८ पोते जयश्रीराम धान, महाराजा सोफा, पाच सिलिंग फॅन, शिलाई मशीन, वाशींग मशीन, आॅईल इंजिन, लोखंडी टेबल, बोअरवेल मोटार, कुकर, लाकडी मुख्य दरवाजा (सर्व प्रत्येकी एक),
बे्रसलेट पिवळ्या धातूचे एक नग, चैन पिवळ्या धातूचे पाच नग, लॉकेट पिवळ्या धातूचे दोन नग, कानातले टॉप पिवळ्या धातूचे चार नग, नेकलस हार पिवळ्या धातूचे एक नग, अंगठी पिवळ्या धातूचे एक नग, मनी पिवळ्या धातूचे २० नग व रोख रक्कम २ हजार ५१५ नोटा, नाणे व इतर किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले.