रोहयो कामावर मिळाली केवळ ६० रूपये मजुरी
By Admin | Updated: June 16, 2016 02:00 IST2016-06-16T02:00:15+5:302016-06-16T02:00:15+5:30
कुरखेडा-कुंभीटोला येथील पांदण रस्त्याच्या कामावरील मजुरांना दिवसभर काम करून केवळ ५० ते ६० रूपये मजुरी मिळत आहे.

रोहयो कामावर मिळाली केवळ ६० रूपये मजुरी
तहसीलवर मजुरांची धडक : कुरखेडा-कुंभीटोला पांदण रस्त्याचे काम
कुरखेडा : कुरखेडा-कुंभीटोला येथील पांदण रस्त्याच्या कामावरील मजुरांना दिवसभर काम करून केवळ ५० ते ६० रूपये मजुरी मिळत आहे. अत्यल्प मजुरीमुळे संतप्त झालेल्या शेकडो मजुरांनी बुधवारी जि. प. सदस्य निरांजनी चंदेल व राकेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली.
यावेळी रोजगार सेवक व अभियंत्यांला घेराव घालून यासंदर्भात जाब विचारण्यात आला. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने मजुरांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तहसीलदारांनी दोन दिवसांत बांधकाम स्थळावर येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मजुरांनी मागे घेतले.
ग्रामपंचायत कुंभीटोला अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मागील दोन आठवड्यांपासून पांदण रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर कामावरील मजुरांना फक्त ५० ते ६० रूपयेच मजुरी पडत आहे. वास्तविक शासकीय धोरणानुसार दिवसभर काम करणाऱ्या मजुराला किमान १९२ रूपये मजुरी मिळणे अपेक्षित आहे. मात्र या कामावर अत्यल्प मजुरी मिळत असल्याने बुधवारी संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. रोजगार सेवक व अभियंता ढवळे यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी खोदकामाच्या मोजमापाप्रमाणे मजुरांची मजुरी काढलेली आहे. बांधकाम स्थळाची माती अत्यंत कठीण असल्याने अपेक्षित मजुरी पडत नसल्याचे त्यांनी सांगितले व कायद्याचे बंधन असल्याने मोजमापात किंवा दरात फेरफार करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे स्पष्ट केले. या उत्तराने समाधान न झालेल्या मजुरांनी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार यू. एम. तोडसाम यांची भेट घेऊन आपली अडचण त्याना समजावून सांगितली. त्यांनी दोन दिवसांत मोका चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मजुरांच्या प्रतिनिधी म्हणून सिंधू इस्कापे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)