रोहयो कामात आठ तालुके माघारले
By Admin | Updated: January 29, 2017 01:32 IST2017-01-29T01:32:40+5:302017-01-29T01:32:40+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या

रोहयो कामात आठ तालुके माघारले
ग्रामपंचायती उदासीन : मजूर उपस्थिती कमी प्रमाणात
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र रोहयोच्या कामात धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा हे चार तालुके आघाडीवर असून येथील रोहयो कामांवर मजुरांची उपस्थिती प्रचंड आहे. मात्र इतर आठ तालुके रोहयोच्या कामात माघारले असल्याचे दिसून येते.
रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या बाराही तालुक्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये विवधि कामे घेण्यात आली आहेत. ५० टक्के कामे ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ५६५ आहे. या कामांवर एकूण १५ हजार १४८ इतकी मजूर उपस्थिती आहे. ५० टक्के यंत्रणास्तरावर सद्य:स्थितीत २७६ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ६८४ मजूर उपस्थिती आहे. ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत ८४१ कामे सुरू असून या कामावर एकूण २० हजार ८३२ इतकी मजूर उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सद्य:स्थितीत रस्त्यांची ७४, बोडीची १७, मजगीची १३०, सिंचन विहिरींची ५३, वृक्ष लागवडीची १९, शौचालय बांधकामाची ३१, रोपवाटीकेची ५३, वन तलाव दुरूस्तीची ५८ व इतर स्वरूपाची १२१ कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामावर ६ हजार २५२, बोडीच्या कामावर २८९, मजगीच्या कामावर ६ हजार ७८८, शेततळ्याच्या कामावर ३४२, सिंचन विहिरीच्या कामावर ४८३ व इतर कामे मिळून एकूण १५ हजार १४८ मजूर उपस्थिती आहे. गडचिरोली तालुक्यात सुरू असलेल्या कामावर ३७०, मुलचेरा तालुक्यातील कामावर १ हजार १५४, देसाईगंज ७२५, अहेरी १ हजार ४१४, एटापल्ली ५७२, भामरागड ३५२, सिरोंचा तालुक्यातील रोहयो कामांवर ३२५ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोची कामे व त्यावरील मजुरांच्या उपस्थितीत सदर आठ तालुके माघारले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
गतवर्षीच्या तुलनेत कामाची मागणी कमी
४गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेती कामे न मिळाल्याने मजूर रिकाम्या हाताने कामाची प्रतीक्षा करीत होती. गतवर्षी जानेवारी महिन्यात रोहयोच्या कामाची मजुरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती नसून रबी हंगामातील शेतीतील कामे सुरू आहेत. त्यामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरांकडून पाहिजे त्या प्रमाणात मागणी होताना दिसून येत नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यात मजुरांकडून रोहयोच्या कामाची मागणी वाढणार आहे.
२०० वर ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे बंदच
४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र सद्य:स्थितीत जिल्ह्यातील केवळ जवळपास २०० ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. मात्र २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू नाहीत. त्यामुळे येथील मजुरांना रोजगार मिळाला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.