संगणक चोरणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: October 3, 2014 01:33 IST2014-10-03T01:33:08+5:302014-10-03T01:33:08+5:30
चामोर्शी तालुक्यातील विविध शाळांमधून संगणकाची चोरी करणाऱ्या एका टोळीला चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे.

संगणक चोरणारी टोळी जेरबंद
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील विविध शाळांमधून संगणकाची चोरी करणाऱ्या एका टोळीला चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील पाच आरोपींकडून ३ लाखाच्या वर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी जिल्हा परिषद शाळा, मुधोली रिठ येथील सम्राट अशोक विद्यालय, मुरखळा चक येथील प्रबुध्द विद्यालय या शाळांमधून ९ मॉनिटर, १० सीपीयू, १० माऊस, ५ किबोर्ड, एक युपीएस, एक प्रोजेक्टर व एक इनव्हटर, दोन सीएफएल बल्ब, एक कॅमेरा असा २ लाख ९२ हजार ५०० रूपयाचा ऐवज चोरीला गेला होता. शाळांना सुटी असल्याचा फायदा घेऊन शाळांमधील संगणक चोरण्याचे काम करणारी ही टोळी चामोर्शी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीमधील अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील आनंदराव अवथरे, प्रफुल रघुनाथ दुर्गे रा. दोघेही मुधोली, बंटी उर्फ अनुराग गजाघाटे रा. चंद्रपूर व मुधोली चक येथील रहिवासी असलेले दोन अल्पवयीन आरोपी यांच्याकडून ७ मॉनिटर, ९ सीपीयू, ३ माऊस, ३ किबोर्ड पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी एकूण ३ लाख २० हजाराचा ऐवज यांच्याकडून जप्त केला. सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धारणे, पोलीस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदारी विजय काळबांधे, अंकूश मेंडके, सतिश कत्तीवार, प्रमोद मडावी, उध्दव मेश्राम यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)