कापूस खरेदीत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात धानासोबतच कापसाचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सिरोंचा तालुक्यात कापसाचे शासकीय ...

Robbery of farmers by merchants in buying cotton | कापूस खरेदीत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

कापूस खरेदीत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

Next
ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान : शासनाच्या हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात धानासोबतच कापसाचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सिरोंचा तालुक्यात कापसाचे शासकीय खरेदी केंद्र नाही. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील कापूस तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यात नेल्या जात आहे. विदर्भाच्या काही भागात हा कापूस व्यापाऱ्यांमार्फत जात आहे. मात्र व्यापारी शासकीय दरापेक्षा कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा, टेकडा, बामणी, झिंगानूर, रंगयापल्ली, कारसपल्ली, सिरोंचा, आरडा, जानमपल्ली, अंकिसा व असरअल्ली आदी भागात अडीच हजार ते तीन हजार हेक्टर क्षेत्रात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. धानपिकासोबतच या भागातील शेतकऱ्यांचा कापसाच्या लागवडीकडे कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. तालुक्यातील शेतकरी दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतात. मात्र गडचिरोेली जिल्ह्यासह तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जिनिंग मिल नाही. तसेच शासकीय खरेदी केंद्रही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव नजीकच्या तेलंगणा राज्यात कापूस विकावा लागतो. तसेच मध्यप्रदेश राज्यातील पांढूर्ण तसेच विदर्भातील हिंगणघाट, नागपूर येथील जिनिंग मिलमध्ये नेऊन कापूस विकावा लागतो. परिणामी भाड्याचे वाहन करून दूर अंतरावर नेऊन कापूस विकावा लागतो. वाहनाचे भाडे परवडत नसल्याची खंत अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापूस खरेदी व्यवहारात व्यापारांसह काही दलालही सक्रिय झाले आहेत. परिणामी त्यांच्याकडून सिरोंचा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील हा अन्याय संपविण्यासाठी सिरोंचा तालुक्यात कापसाचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशीही मागणी होत आहे.

क्विंटलमागे मिळताहे चार हजार रुपये
ज्या ठिकाणी कापसाचे अधिकृत खरेदी केंद्र आहे किंवा जिनिंग मिल आहे, त्या ठिकाणी प्रती क्विंटल पाच ते सहा हजार रुपयांचा भाव कापसाला मिळत आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात व्यापारी व दलाल येऊन चार ते साडेचार हजार रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे.

Web Title: Robbery of farmers by merchants in buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस