संगणक प्रशिक्षणाच्या नावाने लूट
By Admin | Updated: September 25, 2014 23:23 IST2014-09-25T23:23:05+5:302014-09-25T23:23:05+5:30
संगणक प्रशिक्षण ७० टक्के सुटीवर देण्यात येत असल्याचे भासवून गडचिरोली शहरातील जवळपास ५० पालकांकडून लाखो रूपये गोळा करून संगणक प्रशिक्षणकर्ते एक महिन्यापूर्वी पसार झाले आहेत.

संगणक प्रशिक्षणाच्या नावाने लूट
लाखोंनी गंडविले : शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी
गडचिरोली : संगणक प्रशिक्षण ७० टक्के सुटीवर देण्यात येत असल्याचे भासवून गडचिरोली शहरातील जवळपास ५० पालकांकडून लाखो रूपये गोळा करून संगणक प्रशिक्षणकर्ते एक महिन्यापूर्वी पसार झाले आहेत. या ठगांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
साक्षरता अभियानाच्या माध्यमातून पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० टक्के सुटीवर संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पालकाला प्रति विद्यार्थी फक्त १ हजार ९८० रूपये भरावे लागेल, अशी माहिती गांधी वार्ड, सर्वादय वार्ड, फुले वार्डात आॅगस्ट महिन्यात फिरून काही अज्ञात युवकांकडून देण्यात आली. त्याचदरम्यान पोलीस स्टेशनसमोर असलेल्या मोटवाणी कॉम्प्लेक्स येथे एक तात्पूर्ते कार्यालय स्थापन करण्यात आले होते. एमएसआॅफीस या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले जाणार असून सदर प्रशिक्षण तीन महिन्याचे आहे. प्रशिक्षणात विद्यार्थी पास न झाल्यास त्याला पुन्हा संगणक प्रशिक्षणाची संधी देण्यात येईल, विद्यार्थ्याच्या एका भावाला चार रविवारी मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
सुटीवर संगणक प्रशिक्षण मिळत असल्याच्या लालसेपोटी कोणतीही शहनीशा न करता शहरातील जवळपास ५० पालकांनी या संस्थेत प्रवेश घेतला. प्रवेशापोटी १ हजार ९८० रूपये भरून सुद्धा दिले. कार्यालयामध्ये एकही संगणक दिसत नसल्याने काही पालकांनी याबद्दल विचारणा केली असता, सध्या प्रवेश सुरू असून प्रवेश पूर्ण झाल्यानंतर संगणक आणण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी विश्वास ठेवत नगदी १ हजार ९८० रूपये भरून दिले. प्रवेश झाल्यानंतर पंधरा दिवसांनी प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती मोबाईलद्वारे कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही संगणक प्रशिक्षणाबाबत फोन न आल्याने पालकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन बघितले असता, कार्यालयच गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे पालकांच्या लक्षात आले.
काही पालकांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करून बघितला असता सदर फोन नेहमीच बंद असल्याचे सांगत आहे. या जाळ्यात जवळपास शहरातील ५० पालक अडकले आहेत. महत्वाचे म्हणजे याबाबत एकाही पालकाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली नाही. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ एक पावती देण्यात आली असून या पावतीवर युनिक कॅम्प्यूटर अकॅडमी, मोटवानी कॉम्प्लेक्स गडचिरोली एवढाच पत्ता देण्यात आला आहे. मात्र ज्या पाच ते सहा युवकांनी पालकांना गंडविले त्यांचा कोणताही ठोस पत्ता पालकांकडे नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेणेही पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. (नगर प्रतिनिधी)