जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्या
By Admin | Updated: August 30, 2015 01:14 IST2015-08-30T01:14:15+5:302015-08-30T01:14:15+5:30
बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यावर वरूणराजा प्रसन्न झाला.

जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्या
चार तालुक्यात अतिवृष्टी : ५७.४२ मिमी पाऊस; भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प
गडचिरोली : बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यावर वरूणराजा प्रसन्न झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ५७.४२ मिमीच्या सरासरीने ६८९ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाने घेतली आहे. गडचिरोली तालुक्यात ५३.६, धानोरा ५५, चामोर्शी ४२, मुलचेरा ६५, देसाईगंज ८०, आरमोरी ३८.६, कुरखेडा १२८, कोरची ४८.३, अहेरी ४०, एटापल्ली ६७.२, भामरागड ४४.३, सिरोंचा तालुक्यात २७ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा जलस्तर प्रचंड वाढला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडे नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. आलापल्लीवरून भामरागडकडे येणारे वाहने व भामरागडवरून आलापल्लीकडे जाणारे वाहन येथे थांबून होते. वडसा-कुरखेडा मार्गावर शंकरपूरजवळील गाढवी नदीच्या पुलाजवळ पुराचे पाणी पोहोचले. या नदीचाही जलस्तर प्रचंड वाढतीवर आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून शनिवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता.