प्राणहिता नदीत दोघांना जलसमाधी
By Admin | Updated: February 21, 2016 00:49 IST2016-02-21T00:49:48+5:302016-02-21T00:49:48+5:30
तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा सर्कलच्या चंदारम शिवारातील प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची ...

प्राणहिता नदीत दोघांना जलसमाधी
गावात शोककळा : रेगुंठा येथील घटना
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा सर्कलच्या चंदारम शिवारातील प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
लिंगय्या धर्मय्या बिरदू (३७) व तिरूपती मदनय्या नलगुंठा (३२) रा. रेगुंठा अशी मृतकांची नावे आहेत. लिंगय्या व तिरूपती या दोघांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास रेतीवर कपडे काढून ठेवून प्राणहिता नदीच्या पात्रात आंघोळ करण्यास सुरुवात केली. मात्र खोल पाण्यात गेल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. काही वेळाने रामलू हा नदीपात्रात गेला असता दोघेही पाण्यात बुडाले असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती रेगुंठाचे सरपंच श्रीनिवास कडार्लावार यांना देण्यात आली. रेगुंठाचे पोलीस पाटील पेंटय्या पुप्पाला यांनी ही माहिती पोलिसांना दिली. दोघांचेही मृतदेह सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
लिंगय्याच्या मुलीचा कानटोचणीचा कार्यक्रम असल्याने त्याची पत्नी पद्मा साहित्य खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील मंचेरिअल येथे गेली होती. घटनेची माहिती दिल्यानंतर ती तत्काळ घरी परतली. मुलीचा कार्यक्रम असल्याने आत्महत्या करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना दिली. दोघेही पोहण्यात पटाईत असतानाही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे न उलगडणारे कोडे आहे. या घटनेचा तपास रेगुंठाचे प्रभारी अधिकारी रामेश्वर घोंडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार श्यामराव शेरकी, नाईक पोलीस मनीष गर्गे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)