व्यासपीठावरच योग्य कलागुणांची पारख
By Admin | Updated: January 12, 2016 01:20 IST2016-01-12T01:20:53+5:302016-01-12T01:20:53+5:30
विद्यार्थ्यांमध्ये कलागुण दडलेले असतात. मात्र व्यासपीठाअभावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही.

व्यासपीठावरच योग्य कलागुणांची पारख
भाग्यवान खोब्रागडे यांचे प्रतिपादन : आरमोरीत स्पर्श कला व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
आरमोरी : विद्यार्थ्यांमध्ये कलागुण दडलेले असतात. मात्र व्यासपीठाअभावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये आयोजित केले जाणारे संमेलन व विविध कार्यक्रम यातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होतो. या व्यासपीठावरच विद्यार्थ्यांच्या योग्य कलागुणांची पारख होते, असे प्रतिपादन किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी आरमोरी येथे केले.
श्री अंबाबाई खोब्रागडे कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पटांगणात किसनराव खोब्रागडे फाऊंडेशनच्या वतीने चार दिवसीय ‘स्पर्श- २०१६’ कला व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून भाग्यवान खोब्रागडे बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दडवे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचिन खोब्रागडे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. ठाकरे, श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. चंदनपाट, प्राचार्य डॉ. डी. आर. भगत, डॉ. एस. आर. रामटेके, डॉ. एस. गादेवार, कोषाध्यक्ष भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, सोनल खोब्रागडे, संध्या खोब्रागडे, सुशील खोब्रागडे, प्रा. वासनिक, प्रा. सुरकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन खोब्रागडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीष राऊत, संचालन प्रा. अय्यर तर आभार बन्सोड यांनी मानले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. (प्रतिनिधी)