रेशन दुकानांमध्ये होतोय कणीमिश्रित तांदूळ पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:01 IST2019-06-26T23:01:00+5:302019-06-26T23:01:24+5:30
आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.

रेशन दुकानांमध्ये होतोय कणीमिश्रित तांदूळ पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.
गेल्या हंगामातील धानाच्या विक्रमी उत्पादनामुळे यावर्षी राईस मिलर्सना सुगीचे दिवस आले आहेत. भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाकडून तांदळाचे लॉट देताना काही मिलर्सना झुकते माप दिले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. परंतू त्यानंतरही या प्रकाराला आळा घालण्यात पुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यातच भेसळयुक्त तांदळाचे लॉट सर्रास पास करून ते गोरगरीब रेशनकार्डधारकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे.
निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्यापासून सर्वच जण राईस मिलर्सच्या दावणीला बांधल्याप्रमाणे निमूटपणे हे सर्व सहन करत असल्यामुळे शंका-कुशंकांना वाव मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी दौºयावर दौरे करीत असले तरी धान्य पुरवठ्यातील गडबडीकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
‘नवसंजीवनी’च्या धान्य पुरवठ्याची तपासणी करा
रस्ते आणि पुलांअभावी यावर्षीही पावसाला सुरूवात झाल्यानंतर २२३ गावांचे मार्ग बंद होऊन तीन ते चार महिने त्या गावांचा संपर्क तुटणार आहे. त्या सर्व गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत ४ महिन्यांचा धान्य पुरवठा मे अखेरपर्यंत करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतू बहुतांश रेशन दुकानदारांकडे ४ महिन्यांचे धान्य साठवून ठेवण्याएवढी जागाच नाही. अशा स्थितीत खरंच तेवढा पुरवठा त्या गावांमध्ये झाला का, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या धान्य पुरवठ्याचे वरिष्ठ स्तरावरून उलटतपासणी करण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.
चांगल्या तांदळात आणि कणीत फरक
अधिक नफा कमविण्याच्या नादात चांगल्या तांदळात तुटका तांदूळ (कणी) मिसळली जात आहे. विशेष म्हणजे पोत्यांमधील चांगला तांदूळ आणि त्यात असलेली कणी एकाच जातीचे नसून त्यात फरक आढळत आहे. त्यामुळे पोत्यांच्या वाहतुकीदरम्यान तांदूळ तुटल्याचे कारण समोर केल्यास ते खोटे ठरणार आहे. तांदूळ आणि कणी यांच्यातील फरक पाहता तांदळात मुद्दाम कणी मिसळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्या कणीच्या बदल्यात वाचणारा चांगला तांदूळ मिलमालक परस्पर विकून अधिक नफा कमवत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू असलेला हा खेळ बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.