सहा हजार क्विंटल धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:55 IST2019-05-14T23:54:13+5:302019-05-14T23:55:29+5:30
आदिवासी विविध कार्यकारी संस्था सोनसरीने खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ५ हजार ९०० क्विंटल धान अजुनही उघड्यावरच ताडपत्री झाकूनच आहे. सदर धान पावसाळ्यापूर्वी उचलणे गरजेचे झाले आहे.

सहा हजार क्विंटल धान उघड्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी विविध कार्यकारी संस्था सोनसरीने खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ५ हजार ९०० क्विंटल धान अजुनही उघड्यावरच ताडपत्री झाकूनच आहे. सदर धान पावसाळ्यापूर्वी उचलणे गरजेचे झाले आहे.
सोनसरी संस्थेने मागील खरीप हंगामात सुमारे १३ हजार १३० क्विंटल धान खरेदी केले होते. त्यापैकी ५ हजार ८२९ क्विंटल धानाची उचल करण्यात आली. तर ७ हजार ३०० क्विंटल धान अजुनही शिल्लक आहे. यापैकी १ हजार ४०० क्विंटल धान संस्थेच्या गोदामात सुरक्षित ठेवले आहे. मात्र ५ हजार ८०० क्विंटल धान संस्थेच्या आवारात उघड्यावरच पडून आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ताडपत्री कितीही चांगली झाकून असली तरी धान खराब होते. चार वर्षांपूर्वी उघड्यावर ठेवलेले धान खराब झाल्याने महामंडळाला शेकडो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. याच बाबीची पुनरावृत्ती यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धानाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.
सोनसरीचे सरपंच दादा प्रधान, माजी सरपंच चंदू प्रधान, वासुदेव समर्थ, मधुकर दहिकर, कुशन मानकर, आसाराम मडावी, परसराम पदा, जगन मडावी, देवनाथ जमदाळ, मोहन दहिकर, मनिराम वरचे, दीपक धोटे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कुरखेडाचे तहसीलदार यांना देऊन या गंभीर समस्येविषयी त्यांच्यासोबत चर्चा केली.