आरोग्य व्यवस्थेचा आढावा
By Admin | Updated: December 25, 2014 23:33 IST2014-12-25T23:33:03+5:302014-12-25T23:33:03+5:30
राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीदरम्यान तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा
अहेरी : राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीदरम्यान तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी सहसंचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. अहेरी, एटापल्ली तालुक्यात यावर्षी मलेरियाचे हजारो रूग्ण आढळून आले आहेत. मलेरिया रोगाचा प्रसार कशा पद्धतीने कमी करावा, याबाबत उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉ. सतीश पवार यांनी मार्गदर्शन केले. फायलेरिया व डेंग्यू या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच सदर रोग होणारच नाही, याची विशेष काळजी घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून रोगांचा प्रसार थांबविता येईल. आढावा बैठकीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यासुद्धा जाणून घेतल्या. काही रूग्णालयांमध्ये आवश्यक असलेली साधने उपलब्ध नसल्याची बाब आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. सदर साधने तत्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले.
आढावा बैठकीला सर्व ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. संचालकांनी एटापल्ली ग्रामीण रूग्णालय, कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. नागरिकांसोबतही चर्चा केली. (तालुका प्रतिनिधी)