Revenue staff on unpaid strike | महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी ११ जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनास सुरूवात केली आहे. ५ सप्टेंबर रोजी गुरूवारला जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करून बेमुदत संप सुरू करण्यात आला.
अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, गौरीशंकर ढेंगे, विजय करपते, अर्चना वडेट्टीवार आदी उपस्थित होते. यापूर्वी महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे चार टप्पे यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपदग्रस्तांचे पुनर्वसन, स्थलांतर मदतीचे वाटप, पंचनामे आदी कामे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडणे आवश्यक असल्याने १६ आॅगस्ट २०१९ चे लेखणीबंद आंदोलन रद्द करण्यात आले होते. ५ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला.
संपात ललित लाडे, दुषंत कोवे, शशी सिडाम, नितीन सवाईमूल, नितेश सिताडे, जितेंद्र कुळसंगे, अमोल गव्हारे, एस. डी. बारसिंगे, रोहित भादेकर यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

काळ्या फिती लावून केले काम
विविध स्तरावरच्या कर्मचाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सूचनेनुसार जिल्हाभरातील विविध संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम केले. ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. यानंतरही शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ११ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Revenue staff on unpaid strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.