प्रशासनाचा कणा महसूल अधिकारी-कर्मचारी

By Admin | Updated: August 1, 2016 01:37 IST2016-08-01T01:37:46+5:302016-08-01T01:37:46+5:30

निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पाऊस, श्रावण मासारंभ आदींचा अंतर्भाव असलेला आॅगस्ट महिना आॅगस्ट क्रांती

Revenue Revenue Administration-Employee | प्रशासनाचा कणा महसूल अधिकारी-कर्मचारी

प्रशासनाचा कणा महसूल अधिकारी-कर्मचारी

महसूल दिनविशेष : योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका

गडचिरोली : निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पाऊस, श्रावण मासारंभ आदींचा अंतर्भाव असलेला आॅगस्ट महिना आॅगस्ट क्रांती, लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रेरणा सर्वांनाच देतो. मात्र याहून वेगळे म्हणजे, १ आॅगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन. शासनातील महत्त्वपूर्ण विभाग म्हणून गणला जात असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा कणा म्हणून संबोधले जाते.
या दिवशी महसूल विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी होत असतात. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, इतर विभागांचे संनियंत्रण करणे व समन्वय साधणे, महसूल गोळा करणे, निवडणूक व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार सर्व कामे पार पाडणे, गैर महसुली कामे करणे यासह लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे ही कामे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत असतात. त्यामुळे प्रशासन व जनतेमधील दुवा म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहिले जाते. महसूल विभागाच्या या महात्म्यामुळे २००२ पासून महसूल विभागाच्या वतीने उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव १ आॅगस्ट रोजी महसूलदिनी होत असतो. यंदा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव महसूलदिनी नागपुरात होणार आहे.
एवढी कामगिरी असतानासुद्धा शासनातर्फे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित केल्या जाते. प्रत्येक संवर्गातील अनेक रिक्त पदे भरली जात नाही. तलाठी साजातही वाढ केली जात नाही. परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. असंख्य पदे रिक्त असताना त्यांना ठराविक वेळेत पदोन्नती दिली जात नाही. त्यामुळे मूळ पदावरच सेवानिवृत्त व्हावे लागते. (शहर प्रतिनिधी)

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामे
अभिलेखांचे संगणकीकरण, कार्यालयीन प्रकल्प, भूसंपादन, निवडणुकीची कामे, शैक्षणिक दाखले, गौणखनिज, अतिक्रमण हटविणे, रोजगार हमी योजना, वनहक्क, झुडुपी जंगल, परवाना प्रदान करणे, करमणूक कर, अन्न पुरवठा, अकृषक परवानगी, शासकीय जमीन मंजुरी प्रकरणे, अर्धन्यायिक प्रकरणे, व्हीआयपींचे स्वागत, सेतू, कूळ वहिवाट, शिबिर आयोजित करणे, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, दुष्काळी परिस्थिती सांभाळणे, नैसर्गिक आपत्तीत मदत यासह विविध कामे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

बहुतेक शासकीय विभाग आपल्या विभागाचा दिन साजरा करीत असताना त्या विभागातील निम्न पदाच्या नावे दिन साजरा करतात. १ आॅगस्ट हा दिवस महसूल वर्षाचा प्रारंभ दिन असल्याने याच धर्तीवर तलाठी किंवा पटवारी दिन म्हणून साजरा झाल्यास विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव वाढेल.
- प्रकाश डांगे, मंडळ अधिकारी, पोर्ला

Web Title: Revenue Revenue Administration-Employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.