२ कोटी १४ लाखांचा महसूल
By Admin | Updated: August 22, 2015 01:47 IST2015-08-22T01:47:24+5:302015-08-22T01:47:24+5:30
स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १ एप्रिल ते १५ आॅगस्ट २०१५ या चार महिन्यांच्या कालावधीत वाहनांच्या नोंदणीच्या स्वरूपात ...

२ कोटी १४ लाखांचा महसूल
साडेचार महिन्यांत : आरटीओ विभाग झाला मालामाल
गडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १ एप्रिल ते १५ आॅगस्ट २०१५ या चार महिन्यांच्या कालावधीत वाहनांच्या नोंदणीच्या स्वरूपात ३ कोटी २५ लाख ८५ हजार ४७५ व वायूवेध पथकाने ओव्हरलोड व विनापरवाना नोंदणी असलेल्या वाहनावर कारवाई करून ९१ लाख ९४ हजार २४४ रूपयांचा दंड वसूल केला. वरील दोन्हीच्या स्वरूपातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीला साडेचार महिन्यांच्या कालावधीत एकूण ४ कोटी १७ लाख ७९ हजार ७१९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. या महसुलाच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन विभाग मालामाल झाला आहे.
नवीन खरेदी केलेली वाहने, वाहनांचा परवाना, नोंदणी आदींसह विविध कराच्या स्वरूपात गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जून महिन्यात २ कोटी २ लाख ७० हजार ६७५ व जुलै महिन्यात १ कोटी २३ लाख १४ हजार ८०० असा एकूण ३ कोटी २५ लाख ८५ हजार ४७५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. यामध्ये आयएमव्ही शुल्क, सीएफ, दुचाकी वाहने, ग्रीन टॅक्स, टॅक्सी कर आदींचा समावेश आहे.
शासनाने उपप्रादेशिक विभागाच्या वायूवेध पथकाला एप्रिल ते जुलै या चार महिन्यांसाठी २३ लाख ६४ हजार रूपये महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी वायूवेध पथकाने रहदारीच्या मार्गावर गस्त घालून चार महिन्यांच्या कालावधीत ६४ हजार ५६ व १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत ४ लाख २२ हजार असा एकूण ६८ लाख ७८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये गृह राज्य व इतर राज्य महामार्गावर वाहतूक सुरू असलेल्या वाहनांचा समावेश आहे. वायूवेध पथकाने एप्रिल महिन्यात १५ लाख ४२ हजार, मे महिन्यात १६ लाख ७ हजार, जून महिन्यात ११ लाख ८६ हजार व जुलै महिन्यात २१ लाख २१ हजार रूपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल केला.
क्षमतेपक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनावरही मार्गावर रंगेहात पकडून वायूवेध पथकाने कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायूवेध पथकाने एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांच्या कालावधीत रहदारीच्या मार्गावर एकूण २६५ वाहनांची तपासणी केली. यामध्ये ७८ वाहने दोषी आढळून आली. ७८ वाहनांवर जप्तीची कारवाई केली. त्यानंतर तडजोड शुल्क म्हणून ६ लाख ५० हजार ७५० व विभागीय कारवाई अंतर्गत ५ लाख ६० हजार ५३२ असा एकूण १२ लाख ११ हजार २८२ रूपयांचा दंड वसूल केला. याशिवाय वायूवेध पथकाने १ ते ५ आॅगस्ट या पंधरा दिवसांच्या कालावधीत आठ ओव्हरलोड वाहने पकडून संबंधित वाहनधारकांकडून ८२ हजार ९६२ रूपयांचा दंड वसूल केला. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात ४ हजार ५२६ नवी वाहने दाखल
दुचाकी व चारचाकी वाहनांची गरज लक्षात घेता नागरिकांकडून या वाहनांची दिवसेंदिवस खरेदी वाढत आहे. कमी वेळात अधिकाधिक कामे करता यावी, यासाठी बहुतांश नागरिकांचा कल वाहन बाळगण्याकडे आहे. एप्रिल ते १४ आॅगस्ट २०१५ या चार महिन्यांच्या कालावधीत दुचाकी व चारचाकी मिळून गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ५२६ नवीन वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
४ हजार ३८३ वाहनधारकांनी काढला परवाना
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून एप्रिल ते १५ आॅगस्ट २०१५ या साडेचार महिन्यांच्या कालावधीत दुचाकी व चारचाकी मिळून एकूण ४ हजार ३८३ वाहन चालकांनी परवाना काढला. यामध्ये दुचाकीचे ३ हजार ८७८, कारचे २५३, ट्रॅक्टर १९० व ट्रेलर वाहनाच्या ६२ वाहनधारकांनी परवाना काढला आहे. यामध्ये सर्वाधिक जुलै महिन्यात १ हजार १७६ व त्याखालोखाल १ हजार ९२ दुचाकी वाहनधारकांनी परवाना काढला आहे, अशी माहिती गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.