तेलंगणातून वनाधिकारी व चमू रिकामीच परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:53 IST2016-01-09T01:53:02+5:302016-01-09T01:53:02+5:30

आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर कासरगट्टा फाट्याजवळ कापसातून १२ सागवानी लठ्ठे तेलंगणा राज्यात नेण्याच्या प्रकरणी अहेरी...

Returning from Telangana the forest officer and the team empty | तेलंगणातून वनाधिकारी व चमू रिकामीच परतली

तेलंगणातून वनाधिकारी व चमू रिकामीच परतली

कापसातून सागवान तस्करीचे प्रकरण : करीमनगर येथे गेले होते
आलापल्ली : आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर कासरगट्टा फाट्याजवळ कापसातून १२ सागवानी लठ्ठे तेलंगणा राज्यात नेण्याच्या प्रकरणी अहेरी वन विभागाची चमू करीमनगर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेली होती. मात्र पूर्व नियोजन न केल्याने चमूला रिकाम्या हाताने परत यावे लागल्याचा प्रकार घडला आहे.
आलापल्ली येथून अहेरी वन परिक्षेत्राधिकाऱ्याची एक चमू आलापल्लीच्या उपविभागीय वनाधिकाऱ्याच्या नेतृत्वात गेली होती. या चमूत एक वन परिक्षेत्राधिकारी व काही वन कर्मचारी होते. ते मुख्य आरोपी विजयकुमार जीवनलाल केला तसेच सहआरोपी किशोर सतिश जयस्वाल याला घेऊन कबीर मोहम्मद खलील रा. कागजनगर याला अटक करण्यासाठी गेले असता, सोबत एक उच्चस्तरीय वनाधिकारी असून परप्रांतात तपासासाठी जाण्याआधी त्यांनी तेथील वन विभाग किंवा पोलिसांना न कळविता परस्पर कबीर यांच्या पत्यावर पोहोचले. कागजनगरला ही चमू गेली तेव्हा सायंकाळचे ७ वाजले होते. वनाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केल्यावर तेथे खूप मोठा जमाव जमा झाला. त्याची माहित खलील मिळाली व तो वन विभागाची चमू त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या आतच पळून गेला. वास्तविक परप्रांतात आरोपी अटक करण्यासाठी जाताना तेथील आपल्या विभागाच्या किंवा पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक होते. परंतु फिल्मी स्टाईलने त्याच्या घरापर्यंत गेलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले, अशी माहिती एका वन कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला दिली. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने आरोपीला पकडण्यासाठी काम केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. तेलंगणातच त्याला जेरबंद करून येथे आणता आले असते. परंतु नियोजनाचा अभाव, पथकातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीला विरोध न करण्याची भूमिका नडली, अशी चर्चा वन विभागात आहे. (वार्ताहर)

तस्करीच्या तपासाचे प्रकरण सिरोंचा वन विभागाकडे हस्तांतरित होणार
आलापल्ली : आलापल्ली वन विभागातील अहेरी वन परिक्षेत्रामधील अवैध लाकूड तस्करी संबंधातील तपास सिरोंचा वन विभागास हस्तांतरीत करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. हे प्रकरण सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.कापसाच्या गाडीतून अवैध पध्दतीने सागवान तस्करी करताना वन विभागाने चार आरोपींना अटक केली होती. त्या चार जणांची सुरूवातीला वन कोठडीत वन विभागाने चौकशी केली. या चौकशीतून सदर सागवान अवैधरित्या नंदीगाव येथून खरेदी केले, अशी माहिती मिळाली. नंदीगाव येथील एकूण ६ पैकी दोन आरोपींना अटक करण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. यामध्ये आनंद मोडी सिडाम (२६) रा. नंदीगाव व वनिश येर्रा आलाम (५०) यांचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपी फरार आहेत. सदर अवैध सागवनाची कटाई (मुद्देमाल) हा सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन विभागातील असून आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या अहेरी वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पकडला असल्यामुळे अधिक तपासासाठी सदर प्रकरण हे आता आलापल्ली वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन परिक्षेत्राधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

Web Title: Returning from Telangana the forest officer and the team empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.