अहेरी जिल्हा करण्याची जबाबदारी आता भाजपवर
By Admin | Updated: October 21, 2014 22:51 IST2014-10-21T22:51:09+5:302014-10-21T22:51:09+5:30
विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ

अहेरी जिल्हा करण्याची जबाबदारी आता भाजपवर
अहेरी : विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशीही मागणी नाविस सातत्याने करत राहिला. गेल्या काही वर्षात नाग विदर्भ आंदोलन समितीने या मागणीला घेऊन आंदोलनही केलेत. आता नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी मर्यादित कालावधीत स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करून या भागातील आदिवासी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी केली आहे.
२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात उपविभागातील पाच तालुक्यांसह १२ तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय झाले असले तरी अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यांचे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे अंतर किमान २५० किमीपेक्षा अधिक आहे. या भागातील तालुक्यातील गाव अरण्यप्रदेशात व दुर्गम भागात विस्तारलेली आहे. त्यांना गडचिरोली तालुका मुख्यालयात यायचे झाल्यास त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी जातो. तसेच आर्थिक फटकाही त्यांना बसतो. त्यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, ही मागणी करीत आहे. अहेरी उपविभागातील तालुक्यांनी नक्षल समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून अहेरी उपविभागात एकही मोठा सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर सिमेंट व लोह खनिजाचे साठे आहे. या भागात देवलमरी, सुरजागड येथे लोह व सिमेंट प्रकल्प सुरू करू असे आश्वासन आजवरच्या राज्यकर्त्यांनी दिले होते. मात्र एकही प्रकल्प येथे सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे व यातूनच नक्षलवाद वाढीला लागला आहे. या भागातील आदिवासींना समाजाच्या मुख्य धारेसोबत जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत आहे.
२०१० नंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्यावर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने एटापल्ली येथे नवे उपविभागीय अधिकारी कार्यालय निर्माण केले व अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात आले. त्यांनतरही विकासाची प्रक्रिया गतीमान झाली नाही. या भागात वनकायद्यामुळे अनेक गावांना वीज पोहोचविण्यास अडचण आहे. जर अहेरी हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. अहेरी येथे एमआयडीसी निर्माण झाल्यास महाराष्ट्रातील उद्योजक येथे येऊन लोह खनिज उद्योग निर्माण करू शकतात. या भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळू शकते. स्वतंत्र जिल्हा झाल्यास येथे कुशल कामगार निर्माण करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणाची व्यवस्थाही निर्माण होऊ शकते व या पाच तालुक्याच्या विकासाला गती देता येऊ शकते. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, अशी भावना या भागातील आदिवासी, गैरआदिवासी समुदाय व्यक्त करीत आहे.
अम्ब्रीशराव महाराजांच्या रूपाने एक तरूण लोकप्रतिनिधी या भागाला मिळाल्यामुळे या भागातील जनतेला अहेरी जिल्हा निर्माण होईल, अशी आशा वाटत आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीने भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरच पाठिंबा दिला होता. आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे भाजपसोबत नाविसची तेवढीच जबाबदारी आहे, असे मतदारांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)