पीक विमा योजनेस प्रतिसाद वाढला

By Admin | Updated: October 16, 2016 00:54 IST2016-10-16T00:54:13+5:302016-10-16T00:54:13+5:30

गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून ...

Response to crop insurance scheme increased | पीक विमा योजनेस प्रतिसाद वाढला

पीक विमा योजनेस प्रतिसाद वाढला

प्रभावी जनजागृतीचा परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीवर शेतकरी सहभागी
गडचिरोली : गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून एकूण ११ हजार १५२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्हाभरातून तब्बल २३ हजार ७८६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून दुपटीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. कृषी विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृती करण्यात आल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तब्बल २२ हजार २६७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यामध्ये कॅनरा बँकेतर्फे २६, सीबीआय १३४, बीओआय १ हजार ९४५, आयडीबीआय २५७, यूबीआय ८५, बीओएम २ हजार ३२, एसबीआय १ हजार ५९७, व्हीकेजीबी २ हजार ६४ व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक १४ हजार ८२७ शेतकऱ्यांनी बचतखाते काढून पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. २२ हजार ९६७ कर्जदार शेतकऱ्यांनी ३०,१०५.८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. ८१९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ८३७.२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा यंदाच्या खरीप हंगामात विमा काढला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार मिळून एकूण २३ हजार ७८६ शेतकऱ्यांनी २ कोटी ४१ लाख ८४ हजार रूपयांचे प्रिमियम सादर पीक विमा योजनेंतर्गत भरले आहेत.
यावर्षीपासून नव्यानेच कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम गावांसह ग्रामीण भागात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली. त्यानंतर सदर पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

५०६ कोटी रक्कम अदा करण्यास मान्यता
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६ च्या विमा हप्ता अनुदानातील राज्य शासनाच्या हिस्स्याची ५०६ कोटी ८५ लाख ४८ हजार रूपये अदा करण्यास राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. यासंदर्भात राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने १३ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार चार विमा कंपन्यांना सदर रक्कम शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ मध्ये राबविणाऱ्या सर्व कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत विमा हप्ता अनुदानातील येणारा राज्य शासनाचा हिस्सा म्हणून ५०६ कोटी ८५ लाख ४८ हजार रूपये वितरित करण्याबाबत कृषी आयुक्तालयाने शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सदर रक्कम अदा करण्यास मंजुरी प्रदान केली.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम
५ जुलै २०१६ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयात पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीक विमा हप्त्याच्या रकमेचा तपशील नमूद करण्यात आला आहे. भातपिकाला प्रति हेक्टर ३९ हजार रूपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांनी ७८० रूपये पीक विमा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारी पिकांसाठी प्रति हेक्टर २४ हजार रूपये, मका २५ हजार रूपये, तूर २८ हजार, मूग १८ हजार व उडीद १८ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम नमूद करण्यात आली आहे.

गतवर्षी ५ हजार ४९९ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात एकूण ११ हजार १५२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले, असे एकूण ५ हजार ४९९ शेतकरी विम्याच्या रकमेसाठी पात्र ठरले व या शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख ९० हजार २२५ रूपये विम्याच्या स्वरूपात अदा करण्यात आले. यावर्षीही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Web Title: Response to crop insurance scheme increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.