गडचिरोलीतील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: June 18, 2016 00:53 IST2016-06-18T00:53:59+5:302016-06-18T00:53:59+5:30
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या,

गडचिरोलीतील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा
शिक्षणमंत्र्यांना साकडे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासंदर्भात शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली. गडचिरोली जि. प. अंतर्गत सन २०१३-१४ मध्ये झालेल्या २२० नियमबाह्य बदल्या शासनाने यापूर्वीच रद्द केलेल्या आहेत. परंतु या नियमबाह्य बदल्यांसाठी जबाबदार असणारे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली नाही. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित दोषींना निलंबित करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केले.
जिल्हा वार्षिक योजना २०११-१२ मध्ये जि. प. शाळेतील मुला-मुलींसाठी शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. हे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. निकृष्ट बांधकाम करून शौचालयाचा निधी हडपणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ अभियंता व गट समन्वयक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधील वीज बिल अवास्तव येत असल्याने ते शाळास्तरावर भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे महावितरणने अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. जि. प. शाळांमधील सदर वीज बिलाची रक्कम अदा करण्यासाठी शासनस्तरावरून अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवेदन देताना शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, उपाध्यक्ष यशवंत शेंडे, सत्यवान मेश्राम व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)