अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवू
By Admin | Updated: December 24, 2014 23:00 IST2014-12-24T23:00:41+5:302014-12-24T23:00:41+5:30
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अल्पश: मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाताहत होत आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवू
गडचिरोली : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अल्पश: मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाताहत होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. महिला व बालकल्याण राज्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, व्हीसीडीसी योजना बंद करण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्या, वैद्यकीय रजा, देण्यात यावी, आरोग्य व पाणीपुरवठा योजनेचा निधी संयुक्त खात्यात न देता तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यात देऊन व्यवहाराचे अधिकार देण्यात यावे, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक, सामाजिक त्रास देणाऱ्या काही संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पद भरतांना अनुभव असलेल्या व पात्र अंगणवाडी सेविकांमधूनच पदोन्नती करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार देऊ नये, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या इतर कामाचेही बंधन ठेवू नये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारकालीन दीर्घ रजा तसेच इतर सोयी- सुविधा देण्यात याव्या, प्रवासभत्ता त्वरित मंजुर करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात डॉ. देवराव होळी, नंदू नरोटे, अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पुराम उपस्थित होते.