पेंढरी आदर्शग्राम बनविण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:44 IST2016-01-10T01:44:18+5:302016-01-10T01:44:18+5:30
पेंढरी गावामध्ये विविध शासकीय योजना अत्यंत प्रभाविपणे राबवून या गावाचा विकास केला जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरावे.

पेंढरी आदर्शग्राम बनविण्याचा संकल्प
जनजागरण मेळावा : देवराव होळी यांच्या हस्ते शासकीय मदतीचे वाटप
धानोरा : पेंढरी गावामध्ये विविध शासकीय योजना अत्यंत प्रभाविपणे राबवून या गावाचा विकास केला जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरावे. या दृष्टीनेही या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
धानोरा तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रीडा स्पर्धा व जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून एसडीपीओ इंगळे, प्रमोद पिपरे, नंदू काबरा, रमेश भुरसे, गोवर्धन चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव शेडमाके, जिल्हा परिषद सदस्य शांताबाई परसे, पंचायत समिती सदस्य जास्वंदाबाई करंगामी, प्रा. गलगट, सरपंच सुदर्शन आतला, डॉ. सुरेश चौधरी, लीलाबाई वाणी, करंगामी, दशरथ पुंगाटी, चित्रलेखा रायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला पेंढरी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. निराधार नागरिकांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. या जनजागरण मेळाव्यादरम्यान मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी सोनवणे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फतीने जाणून घ्यावी, त्याचबरोबर अर्ज तयार करून संबंधित विभागाकडे पाठवावा, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)