सर्चच्या युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठीचा संकल्प
By Admin | Updated: March 4, 2016 01:23 IST2016-03-04T01:23:41+5:302016-03-04T01:23:41+5:30
सर्च या सामाजिक संस्थेत १ ते ३ मार्च या कालावधीत पार पडलेल्या आदिवासी युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठी गावागावात ...

सर्चच्या युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठीचा संकल्प
आरोग्य महिलेस किटचे वाटप : ४७ देहारी, पुजाऱ्यांचा सत्कार
धानोरा : सर्च या सामाजिक संस्थेत १ ते ३ मार्च या कालावधीत पार पडलेल्या आदिवासी युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठी गावागावात जाऊन लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संसदेत धानोरा तालुक्यातील ३५ गावातून ३१८ युवा सहभागी झाले होते. या संसदेला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, माजी आ. हिरामन वरखडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संसदेत आम्ही आमच्या गावात युवांचे खेळ सुरू करू, त्यात कबड्डी व व्हॉलिबॉल या खेळांची निवड करू, युवा खेळासाठी गावागावातून युवा कोचची निवड करून त्यास सर्चच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊ, जिल्हा पातळीवर युवा खेळ स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी धानोरा तालुक्याची टीम तयार करू, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लोकांकडून शिकू, आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम गावात आयोजित करू, दारू व व्यसनमुक्तीची सुरुवात स्वत:पासून सुरू करू, युवक, युवती, लहान मुले यांना दात घासण्यासाठी दातन वापरण्याबाबत मार्गदर्शन करू, तंबाखू व तंबाखू मुक्तीसाठी गावातील पुजारी व ज्येष्ठ नागरिक यांना समजावून सांगून निर्णय घेऊ, गावातील दारू दुकानदारास दंड करू, बंदी करण्यास सांगू आदी निर्णय युवांनी घेतले.
१ मार्च रोजी अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात उद्धव डांगे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने ७० परवान्याचे वाटप आरोग्य संसदेत करण्यात आले. धानोरा तालुक्यातील ४८ गावातील नवजात बालकांची काळजी या कार्यक्रमांतर्गत बाळ व बाळंतीनची काळजी घेणाऱ्या स्त्रियांना साहित्यकीट देण्यात आली. तसेच ३ मार्च रोजी सकाळी मॉ दंतेश्वरी माऊलीची पालखी सकाळी ९ वाजता काढण्यात आली. व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धेमध्ये विजेत्या कुथेगाव, भेंडीकन्हार, उशिरपार, गट्टेपायली, कोवनटोला या संघांना २ हजार रूपयांचे प्रथम व १ हजार रूपयांचे द्वितीय बक्षीस देण्यात आले.
यावेळी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी गावातून आलेल्या ४७ देहारी व पूजारी तसेच इलाखा प्रमुखांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)