कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध
By Admin | Updated: March 3, 2016 01:32 IST2016-03-03T01:32:18+5:302016-03-03T01:32:18+5:30
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा निर्माण करण्याचा विचार शासन करीत आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध
५ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा : शिक्षक परिषद शासनाला पाठविणार निवेदन
गडचिरोली : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा निर्माण करण्याचा विचार शासन करीत आहे. यानिर्णयाचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला आहे
शासनाच्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ५०९ शाळा व गडचिरोली तालुक्यातील २४ शाळांवर गंडांतर येणार आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तसेच जिल्ह्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनाला निवेदन पाठविणार आहेत.
जिल्ह्यात प्राथमिकस्तरावर लोकसहभागातून काही शाळा डिजीटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुसज्ज केल्यास विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत. जास्तीत जास्त विद्यार्थी तेथेच शिकतील. परंतु शासन त्यासाठी खर्च करायला तयार नाही.
समूह शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, असे शासन सांगत आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी होईल, काय याबाबत शंका आहे. गावातच शाळा असूनही विद्यार्थी येण्यास तयार होत नाही. त्याअर्थी दुसऱ्या गावी विद्यार्थी जाणार काय, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. शासनाचा हा नवीन निर्णय गरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मारक असून सदर निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे निवेदनातून केली जाणार आहे.