निवासस्थान इमारतीचे हस्तांतरण रखडले
By Admin | Updated: April 6, 2016 01:10 IST2016-04-06T01:10:11+5:302016-04-06T01:10:11+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यासाठी ....

निवासस्थान इमारतीचे हस्तांतरण रखडले
चार महिने उलटले : विद्युत मीटरसाठी डिमांड न भरल्याचे कारण
आष्टी : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यासाठी आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून १० निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन आता चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र विद्युत विभागाच्या वतीने या इमारतीत वीज जोडणीसाठी मीटर लावण्यात न आल्याने या निवासस्थान इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली क्र. २ मार्फत १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त निवासस्थान इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. शिवाय या निवासस्थानापर्यंत विद्युत खांब टाकण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीच्या वतीने विद्युत विभागाकडे वीज जोडणीसाठी मीटरची डिमांड भरण्यात आली नाही. त्यामुळे या इमारतीत वीज मीटर लावण्यात आले नाही. परिणामी सदर निवासस्थान गेल्या चार महिन्यांपासून येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले नाही.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आष्टी येथील ग्रामस्थांनी सदर निवासस्थानाचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला होता. यावर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना योग्य पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यासंदर्भात अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)
नळ तोट्या व साहित्य लंपास
आष्टी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी २, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांसाठी ५ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी ३ असे एकूण १० निवासस्थान बांधण्यात आले. या इमारतीची देखभाल करण्यासाठी चौकीदार ठेवण्यात आला होता. मात्र चार महिन्यांपासून त्याचे वेतन थकल्याने त्याने काम सोडले. परिणामी येथील नळ तोट्या व अन्य साहित्य चोरीला गेले आहे.