दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By Admin | Updated: October 8, 2015 01:04 IST2015-10-08T01:04:03+5:302015-10-08T01:04:03+5:30
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी ...

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
विद्यार्थी मृत्यू प्रकरण : आविसं पदाधिकारी व वसतिगृह विद्यार्थ्यांची मागणी
गडचिरोली : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अनुदानित आश्रमशाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक जबाबदार आहेत. संबंधित दोषींवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला आविसंचे गडचिरोली अध्यक्ष क्रांती केरामी, देवयत्री टोहलिया, प्रकाश मट्टामी, संदीप वरखडे, रविता नैताम, रोहित वड्डे, मानवाधिकार संघटनेचे गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गडचिरोलीच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल गीता किन्नाके व तेथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या वसतिगृहाची विद्यार्थिनी प्रगती भजनदास उईके हिचा ४ आॅक्टोबर २०१५ रोजी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. कन्हाळगाव अनुदानित आश्रमशाळेची विद्यार्थिनी छाया कटिया पुंगाटी हीचा २९ सप्टेंबर २०१५ रोजी तेथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. तसेच इंदिरा आश्रमशाळा सुकाळाचा विद्यार्थी सुभाष इष्टाम याचा ३ आॅक्टोबर रोजी संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील आश्रमशाळा वसतिगृह बंद पाडू, असा इशारा दिला
मुलींचे वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची प्रकल्प कार्यालयाच्या स्वतंत्र पथकामार्फत तसेच आदिवासी विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून चौकशी सुरू आहे. सुकाळा आश्रमशाळेला आपण मंगळवारी भेट दिली. यावेळी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले. आश्रमशाळा प्रशासन विद्यार्थी मृत्यू प्रकरणास जबाबदार असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. त्यामुळे सुकाळा आश्रमशाळेच्या संस्थाचालकांना गैरव्यवस्थेबाबत नोटीस बजावणार आहोत. चौकशी अहवालानंतर विद्यार्थी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करणार
- विकास राचलेवार, प्रकल्प अधिकारी गडचिरोली