३० वर्षांनंतर कार्यालय इमारतींची दुरूस्ती
By Admin | Updated: December 30, 2014 23:35 IST2014-12-30T23:35:00+5:302014-12-30T23:35:00+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे.

३० वर्षांनंतर कार्यालय इमारतींची दुरूस्ती
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे.
जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र प्रत्येकच शासकीय कार्यालयाला सुसज्ज इमारत बांधून देणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठमोठे चार बॅरेक बांधले. या इमारतींमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा दुग्ध कार्यालय, राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग, नगर रचना कार्यालय आदी जवळपास २० ते २५ कार्यालये या ठिकाणी स्थापन करण्यात आले.
सदर इमारतींचे बांधकाम १९८३ ते १९८५ या कालावधीत करण्यात आले. शासकीय खर्च वाचविण्यासाठी या इमारतींवर सिमेंटने बनलेले पत्रे टाकण्यात आले. ३० वर्षांमध्ये छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटले होते. त्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयामध्ये गळत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर महत्वाचे दस्ताऐवजही खराब होण्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे या बॅरेकची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक व या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत होती. मात्र चारही बॅरेकच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने शासनाकडून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष केले जात होते.
दस्ताऐवजाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन शासनाने सदर बॅरेकच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून या बॅरेकच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या बॅरेकमधील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असलेले पहिले बॅरेक असून याच बॅरेकपासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुने पत्रे बदलवून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणचे आडे मोडले असून सदर आडेही बदलविले जात आहेत.
आजपर्यंत गळत्या छताखाली नागरिकांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. कार्पोरेट लूकप्रमाणे सदर कार्यालय दिसणार नाही. मात्र ऊन, वारा, पाऊस यापासून किमान संरक्षण होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या दुरूस्तीचे काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)