गोगाव येथील उपसा सिंचन योजनेची दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 02:18 IST2016-08-29T02:18:27+5:302016-08-29T02:18:27+5:30

तालुक्यातील गोगाव येथील उपसा सिंचन योजना दुरूस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Repair of Laxa Irrigation Scheme in Gogav has started | गोगाव येथील उपसा सिंचन योजनेची दुरूस्ती सुरू

गोगाव येथील उपसा सिंचन योजनेची दुरूस्ती सुरू

आंदोलनाचा परिणाम : सिंचन विभागाचे अधिकारी दाखल
गडचरोली : तालुक्यातील गोगाव येथील उपसा सिंचन योजना दुरूस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सदर उपसा सिंचन योजना लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोगाव येथील उपसा सिंचन योेजनेच्या माध्यमातून ७०० हेक्टरला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही या योजनेच्या भरवशावर पीक झाले होते. उन्हाळ्यामध्ये या योजनेची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजना बंद पडली होती. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक पाण्याअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे उपसा सिंचन योजना सुरू करणे आवश्यक होते. गावातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन योजना सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. गावातील नागरिकांनी गुरूवारी सिंचन योजनेवर जाऊन आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत कारवाफा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी डी. जी. कोहाडे, स्थापत्य अभियंता राकू गेडेकर, गड्डमवार, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष रामदास बोबाटे, शेतकरी कालिदास चापले, नानाजी चौधरी, मधुकर चौधरी, भक्तदास चौैधरी, सीताराम टेंभूर्णे, भास्कर मुनघाटे, बापूजी दिवटे, भास्कर म्हशाखेत्री, गणेश पालेरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

आंदोलनाचा दिला इशारा
सिंचन योजना दुरूस्त करणारी टीम आल्याचे माहित होताच गावातील नागरिकांनी सिंचन योजनेकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी डी. जी. कोहाडे यांनी सिंचन योजना सुरू केली जाईल, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे धानपीक करपू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले. योजना सुरू न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title: Repair of Laxa Irrigation Scheme in Gogav has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.