Repair of Lahiri road from labor | श्रमदानातून लाहेरी रस्त्याची दुरूस्ती

श्रमदानातून लाहेरी रस्त्याची दुरूस्ती

ठळक मुद्देखड्डे बुजविले : वाहतूक सुविधेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने भामरागड तालुक्यात कहर केला. पावसामुळे भामरागड-लाहेरी मार्गाची दुरवस्था झाली. यापैकी चार किमी अंतराच्या रस्त्याची श्रमदानातून ग्रामस्थांनी दुरूस्ती केली. या कामात पोलीस जवानांनीही योगदान दिले.
लाहेरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी महारूद्र परजने यांच्या मार्गदर्शनात लाहेरीवासीयांनी श्रमदान करून सदर मार्गाची दुरूस्ती केली. पावसामुळे लाहेरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत होता. सदर मार्गावर अपघाताची शक्यताही बळावली होती.
यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे श्रमदानातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय प्रभारी पोलीस अधिकारी परजने यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दर्शविला. बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता दुरूस्त करण्याचा संकल्प केला. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी रविवारला श्रमदान करून लाहेरी मार्गाची दुरूस्ती करण्यात आली. यावेळी ३०० पेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष सहकार्य केले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामंडळाच्या बसगाड्या बंद होण्याच्या स्थितीत होत्या. त्यामुळे श्रमदानातून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. पाच ट्रॅक्टर व दोन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. यावेळी पोलीस जवान व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले.

Web Title: Repair of Lahiri road from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.