आश्रमशाळा इमारतीची दुरूस्ती सुरू

By Admin | Updated: September 29, 2014 23:05 IST2014-09-29T23:05:07+5:302014-09-29T23:05:07+5:30

आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रूपयाच्या निधीतून गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Repair of Ashram Shala building started | आश्रमशाळा इमारतीची दुरूस्ती सुरू

आश्रमशाळा इमारतीची दुरूस्ती सुरू

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रूपयाच्या निधीतून गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चामोर्शी येथील मुलामुलींचे वसतिगृह व कुरखेडा वसतिगृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी आदिवासी विकास विभागाने ३२ लाख ७७ हजार रूपयाचा निधी दिला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या अधिनस्त २५ शासकीय आश्रमशाळा व शहराच्या ठिकाणी वसतिगृह आहेत. यापैकी अनेक आश्रमशाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. काही आश्रशाळांचे छत पावसाळ्यात गळते. यामुळे आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना त्रास होत होता. तसेच काही वसतिगृहाच्या इमारती दूरावस्थेत होत्या. अशा इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी संबंधीत आश्रशाळांचे मुख्याध्यापक व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तसेच अप्पर आयुक्तांकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारतीची दुरूस्ती करण्यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाला निधी दिला. गडचिरोली प्रकल्पातील कुरखेडा तालुक्यातील अंगारा, येंगलखेडा, रामगड, धानोरा तालुक्यातील रांगी, कारवाफा, गोडलवाही, पेंढरी, येरमागड, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, रेगडी, भाडभिडी, गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव, कोरची तालुक्यातील कोरची, कोटगुल आदी आश्रमशाळांच्या इमारतीच्या दुरूस्तीला आदिवासी विकास विभागाने मंजुरी दिली. सद्य:स्थितीत अंगारा आश्रमशाळेला ४ लाख ९६ हजार १२०, रेगडी आश्रमशाळेला २५ लाख, कारवाफा आश्रमशाळेला २५ लाख, पेंढरी आश्रमशाळेला २४ लाख ९८ हजार ८८५, पोटेगाव आश्रमशाळेला ३८ लाख ८७ हजार १६६, रामगड आश्रमशाळेला ४ लाख ९२ हजार ९००, कोरची आश्रमशाळेला १२ लाख ५६ हजार व कोटगुल आश्रमशाळेला १४ लाख ७० हजार ९६८ रूपयाचा निधी दुरूस्तीकरिता प्राप्त झाला आहे. सदर निधी मार्च महिन्यामध्ये मिळाल्याने या आश्रमशाळांची दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे. इतर आश्रमशाळांच्या दुरूस्तीसाठी सन २०१४-१५ च्या बजेटमध्ये आदिवासी विकास विभागाने तरतूद केली आहे. सदर निधी प्राप्त होताच उर्वरित आश्रमशाळांच्या इमारतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत चामोर्शी येथील मुलामुलींचे वसतिगृह व कुरखेडाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Repair of Ashram Shala building started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.