सार्वजनिक रस्त्यावरील व्यावसायिक व फुटपाथधारकांचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST2021-07-07T04:46:08+5:302021-07-07T04:46:08+5:30
आरमोरी : स्थानिक नगर परिषदेने सोमवार, दि. ५ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन शहरातील सार्वजनिक रस्त्यावर ...

सार्वजनिक रस्त्यावरील व्यावसायिक व फुटपाथधारकांचे अतिक्रमण हटविले
आरमोरी : स्थानिक नगर परिषदेने सोमवार, दि. ५ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन शहरातील सार्वजनिक रस्त्यावर अनेक व्यावसायिक व नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढले आहे. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटल्याने आता रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत.
आरमोरी शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार व फुटपाथधारकांनी रस्त्यावर शेड बांधून अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी जाहीर सूचना देण्यात आली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने साेमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली व सार्वजनिक रस्त्यावर व नालीवर असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढून रस्ते मोकळे केले.
सोमवारी जुन्या बसस्थानकापासून तर नगर परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिक व छोट्या दुकानदारांनी लावलेले टिनाचे शेड, झोपड्यांचे अतिक्रमण काढले. दुसऱ्या दिवशीही मंगळवारला अतिक्रमण मोहीम राबवून इंदिरा गांधी चौकापासून गुजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात सर्वाधिक वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होत होती. त्यामुळे दुकानलाइनमधीलही अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढतेवेळी अनेकांच्या घराच्या पायऱ्याही तोडण्यात आल्या. त्यानंतर काळागोटाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणही काढण्यात आले.
060721\img_20210706_204113.jpg
अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत रस्त्यावर असलेले झाड हटविताना