प्राणहिता नदीवरील दारू दुकाने हटवा
By Admin | Updated: November 14, 2015 01:31 IST2015-11-14T01:31:59+5:302015-11-14T01:31:59+5:30
तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी,..

प्राणहिता नदीवरील दारू दुकाने हटवा
अमोल मुक्कावार यांची मागणी : कागजनगरच्या आमदारांशी चर्चा करून दिले निवेदन
अहेरी : तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी, अशी मागणी अहेरी नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी तेलंगणाचे आ. कानेरू कोनप्पा यांना निवेदन देऊन केली आहे. या समस्येसंदर्भात मुक्कावार यांनी कोनप्पा यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली.
ंअहेरी-गुडेम पुलाबाबत चर्चा करण्यासाठी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आ. कोनप्पा हे अहेरी येथे आले होते. यावेळी अमोल मुक्कावार यांनी कोनप्पा यांना निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान अमोल मुक्कावार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दशकापेक्षा अधिक कालावधीपासून दारूबंदी आहे. याचा गैरफायदा उचलण्यासाठी तेलंगणा राज्यातील काही दारू दुकानदारांनी दारूची दुकाने प्राणहिता नदीच्या काठावर स्थापन केली आहेत. या दारू दुकानांमध्ये तेलंगणा राज्यातील फारसे ग्राहक येत नाही. मात्र या दुकानांमधून नदी मार्गे दारूची वाहतूक अहेरी तालुक्यात केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा अहेरी तालुक्यात काहीच परिणाम दिसत नाही. यामुळे दारू दुकानदार व अहेरीतील दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी सामान्य नागरिकांचे कुटुंब मात्र रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेलंगणा राज्याने याबाबीची दखल घेऊन नदीपासून ४० किमीच्या अंतरात दारूची दुकाने थाटण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वांगेपल्ली पुलानंतर अहेरीतील दारूबंदीवर परिणाम
तेलंगणा राज्य शासनाने पुढाकार घेत प्राणहिता नदीवर पूल बांधकामासाठी सुमारे ९५ कोटी रूपये मंजूर केल आहेत. या पुलाचे बांधकामाची निविदाही काढण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात प्राणहिता नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर दारूची दुकाने थाटली आहेत. या दुकानातील दारू सध्य:स्थितीत नदीद्वारे आणली जात आहे. नदीतून दारू आणताना अनेक अडचणींचा सामना दारूविक्रेत्यांना करावा लागत आहे. त्यामुळे दारूच्या वाहतुकीवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली पुलाची निर्मिती झाल्यानंतर पुलावरून खुलेआम दारू आणली जाईल. त्याचबरोबर अहेरी परिसरातील नागरिकांनाही तेलंगणा राज्यात दारू पिण्यासाठी जाणे सोयीचे होणार आहे. परिणामी या पुलामुळे अहेरी व परिसरात आणखी दारूचे लोट वाहणार आहेत. त्यामुळे नदीपुलाच्या निर्मितीपूर्वीच दारूची दुकाने हटविणे गरजेचे आहे.