इटिया डोहाच्या पाण्याने गावे व पशुपक्ष्यांना दिलासा
By Admin | Updated: April 24, 2016 01:44 IST2016-04-24T01:23:10+5:302016-04-24T01:44:31+5:30
राज्यात व गडचिरोली जिल्ह्यातही अनेक गावात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना पाजण्यासाठी पाणी आणण्याकरिता पायपीट सुरू आहे.

इटिया डोहाच्या पाण्याने गावे व पशुपक्ष्यांना दिलासा
आरमोरी : राज्यात व गडचिरोली जिल्ह्यातही अनेक गावात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना पाजण्यासाठी पाणी आणण्याकरिता पायपीट सुरू आहे. अशा परिस्थितीत इटिया डोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील गावे, शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी तापमानाचा पारा ४४ अंशाच्या वर असून वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी विहिरीतील पाणी पातळी खोल गेली आहे. तर अनेक तालुक्यात विहिरी कोरड्या पडल्या आहे. आरमोरी तालुक्यातही बरेचशे तलाव कोरडे झाले आहे. त्यामुळे पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत होते. आरमोरी शहरातील वडसा मार्गावरील बर्डी परिसरातील अनेक घरगुती विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा जलस्तर कमी झाला होता. परंतु आता गोंदिया जिल्ह्यातून इटिया डोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पाण्यामुळे खालावलेला जलस्तर कायम राखण्यात मदत होईल. तसेच पशुपक्ष्यांना पाण्यासाठी व्यवस्था होईल. या पाण्याचा शेतीसाठी वापर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)