शिक्षण विभाग प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST2021-02-20T05:44:08+5:302021-02-20T05:44:08+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता राखून ते टिकविण्याची जबाबदारी तालुका व जिल्हास्तरावरील शिक्षण विभागाच्या ...

शिक्षण विभाग प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता राखून ते टिकविण्याची जबाबदारी तालुका व जिल्हास्तरावरील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच शिक्षण विभागाचा कारभार सुरू आहे. रिक्तपदांमुळे या विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा कुचकामी ठरत असून याचा परिणाम शाळा गुणवत्तेवर हाेत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १ हजार ५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावरील शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षीय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. या पर्यवक्षीय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अहेरी उपविभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची बरीच पदे रिक्त असल्याने या भागातील जि.प.प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्तेवर परिणाम हाेत आहे. जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत बाराही तालुके मिळून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी निम्मे पदे भरण्यात आली असून निम्मे पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने या पदाचा प्रभार ज्येष्ठ शिक्षक व मुख्याध्यापकांकडे साेपविण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा प्रभार साेपविण्यात आला आहे. शिवाय गटशिक्षणाधिकारी व जिल्हास्तरावरील या विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम नियंत्रणावर हाेत आहे.
बाॅक्स....
दुर्गम भागातील शाळा रामभराेसे
अहेरी, सिराेंचा तालुक्यातील केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने या भागातील दुर्गम शाळा रामभराेसे असल्याचे दिसून येते. शहरी भागात नाेकरी करणारे अनेक शिक्षक बऱ्याच वर्षानंतर अहेरीसारख्या दुर्गम भागात गेले. दुर्गम भागात असलेले शिक्षक आळीपाळी करून शाळांवरील कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते. सुगम व शहरी भागात कुटुंब असलेले अनेक शिक्षक शुक्रवारची अर्धी शाळा करून दुपारून आपल्या गावाकडे रवाना हाेतात. साेमवारी उशिरा शाळेत पाेहाेचत असल्याची माहिती आहे. काही शिक्षकांच्या तर आठवड्यातून दाेन ते तीन अघाेषित सुट्या असल्याचेही दिसून येते.