पावसाच्या हजेरीने गडचिरोलीकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:14 IST2019-06-17T23:13:54+5:302019-06-17T23:14:08+5:30
मृग नक्षत्र ओलांडल्यानंतरही पाऊस नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या गडचिरोलीकरांना सोमवारी सायंकाळी सुखद दिलासा मिळाला. दिवसा कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येत होता. दुपारी १ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.

पावसाच्या हजेरीने गडचिरोलीकरांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मृग नक्षत्र ओलांडल्यानंतरही पाऊस नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या गडचिरोलीकरांना सोमवारी सायंकाळी सुखद दिलासा मिळाला. दिवसा कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येत होता. दुपारी १ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.
गडचिरोली सोबतच जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार कुरखेडा तालुक्यात १.१ मिमी, एटापल्ली ४.१, धानोरा ४.१, कोरची ४.८, मुलचेरा ८.४, भामरागड ६.६ मिमी पाऊस पडला होता. दुपारी पुन्हा गडचिरोलीसह अनेक ठिकाणी पाऊस बरसला. जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
मागील वर्षी पडला १३१ मिमी पाऊस
१७ जूनपर्यंत मागील वर्षी सुमारे १३१ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी केवळ ६.७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस उशीरा आला आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुध्दा खोळंबली आहेत. शेतकरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहे.