ताडगावचे रुग्णालय परिचारिकेच्या भरवशावर
By Admin | Updated: August 22, 2015 01:55 IST2015-08-22T01:55:40+5:302015-08-22T01:55:40+5:30
तालुक्यातील ताडगाव येथील आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील एक वर्षापासून रिक्त आहे.

ताडगावचे रुग्णालय परिचारिकेच्या भरवशावर
भामरागड : तालुक्यातील ताडगाव येथील आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील एक वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे येथील संपूर्ण कारभार आरोग्यसेविका व कम्पाऊंडर सांभाळत आहेत. एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत आल्यास त्याला भामरागड ग्रामीण रुग्णालय किंवा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात पाठविल्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ताडगाव परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी आरोग्य पथक मंजूर केले आहे. या आरोग्य पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक कम्पाऊंडर, आरोग्यसेविका, सफाई कामगार व वाहन चालक ही पदे मंजूर आहेत. मागील काही दिवसांपूर्वी यातील सर्वच पदे भरण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य पथकाचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू होता. रुग्णांना तपासण्याची व त्यांना औषधे देण्याची जबाबदारी ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर आहे, ते पद मागील एक वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे येथील कारभार कम्पाऊंडर व आरोग्यसेविकेच्या भरवशावरच चालविला जात आहे. या ठिकाणी एका महिला डॉक्टरची नेमणूक करण्यात आली होती. त्या प्रसूती सुटीवर गेल्या तेव्हापासून त्या परतल्याच नाही. मध्यंतरी भामरागडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुंगारे अधूनमधून उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून घेत होते. त्यांनी आठवड्यातील काही दिवस ठरवून दिले होते. त्या दिवशी ते येत असल्याने परिसरातील रुग्णही नेमके त्याच दिवशी उपस्थित राहत होते.
काही दिवसानंतर लाहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरपाम यांना ताडगाव येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच डॉ. सुरपाम यांची ताडगाव येथील प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मन्नेराजाराम येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. तेव्हापासून येथे कार्यरत औषधी संयोजक मुनगेलवार व आरोग्यसेविका सपना भुरसे आपल्यापरीने रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र डॉक्टर नसल्याने गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्यास त्याला दवाखान्यात ठेवण्याची जोखीम ते उठवू शकत नाही. या रुग्णालयात दरदिवशी २० ते २५ रुग्ण येतात. गरोदर माताही रुग्णालयात दाखल होतात. मागील महिन्यात या रुग्णालयात पाच महिलांची प्रसूती करण्यात आली.
भामरागड व हेमलकसा या दोन्ही ठिकाणी रुग्णालय आहे. मात्र हे दोन्ही ठिकाण ताडगावपासून बऱ्याच दूर अंतरावर आहेत. त्यामुळे ताडगाव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी ताडगाव परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)